Talathi Exam : आंदोलन, बंदमुळे तलाठी परीक्षा रद्द होणार नाहीत | पुढारी

Talathi Exam : आंदोलन, बंदमुळे तलाठी परीक्षा रद्द होणार नाहीत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मराठा संघटनांचे आंदोलन, निदर्शने, बंदमुळे सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, तलाठी भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही किंवा रद्दही करण्यात येणार नाहीत, असे भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आले. सध्या अंतिम म्हणजेच तिसर्‍या टप्प्यातील परीक्षा सुरू आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यभरातून साडेअकरा लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती 4466 जागांसाठी दहा लाख 40 हजार 713 एवढे प्राप्त झाले आहेत.

ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार 17 ते 22 ऑगस्ट पहिला टप्पा, 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दुसरा टप्पा पार पडला असून 4 सप्टेंबरपासून तिसर्‍या टप्प्याला सुरूवात झाली आहे. कोणत्याही कारणास्तव परीक्षा पुढे ढकलता येणार नाही किंवा रद्दही करता येणार नसल्याचे भूमी अभिलेखकडून सांगण्यात आले.

’तलाठी भरती परीक्षेसाठी यंदा विक्रमी अर्ज आले आहेत. आतापर्यंत परीक्षेची 42 टप्पे पार पडले आहेत. ही परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. काही कारणांनी एखाद्या दिवशी परीक्षा रद्द झाली किंवा पुढे ढकलण्यात आल्यास पुढील तीन महिने परीक्षा घेता येणार नसल्याचे परीक्षा घेणार्‍या कंपनीने कळविले आहे. कारण या कंपनीकडून देशभरातील विविध परीक्षा घेण्यात येतात. तसेच राज्यात कुठेही निवडणूक आचारसंहिता लागल्यास त्या ठिकाणी परीक्षा घेता येत नाही.

या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाकडून महसूल, जिल्हा प्रशासन, पोलीस अशा सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. तसेच एका दिवशी सुमारे 60 हजार उमेदवारांच्या परीक्षेचे नियोजन आहे. त्यामुळे या उमेदवारांची मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलणे शक्य होणार नाही,’ अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

परीक्षेचा अंतिम टप्पा
4 ते 14 सप्टेंबर (7, 9, 11, 12 आणि 13 सप्टेंबर या दिवशी परीक्षा नाही)

हेही वाचा

जुनी डबलडेकर १५ ला घेणार निरोप

पुणे : समाविष्ट गावांमधील मालमत्ता विक्रीचा मनस्ताप

Back to top button