पावसाचे पाणी, साठलेले पाणी, यामध्ये डासांची पैदास होते आणि त्यातून प्रादुर्भाव वाढतो. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने कीटकजन्य आजारांचे प्रमाण घटेल, असा कीटकतज्ज्ञांचा अंदाज होता. मात्र, रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप म्हणाले, यंदा पावसामध्ये सातत्य नसले, तरी थांबून थांबून पडत आहे. त्यामुळे पाणी साचतेच आणि डासोत्पत्ती स्थानेही निर्माण होतात. त्यामुळे कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढते. बरेचदा वर्षभर पाऊस पडत असल्याने जानेवारी-फेब्रुवारीतही कीटकजन्य आजारांचे रुग्ण सापडतात. विदर्भातही रुग्णसंख्या मोठी आहे.