शेतकर्‍याला पोलिसांनी दिला दिलासा ; चोरीला गेलेला ट्रॅक्टर सहा महिन्यांत शोधला | पुढारी

शेतकर्‍याला पोलिसांनी दिला दिलासा ; चोरीला गेलेला ट्रॅक्टर सहा महिन्यांत शोधला

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : घराजवळ लावलेला चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा सहा महिन्यांत शोध लावत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस जेरबंद करून शेतकर्‍यास मोठा दिलासा दिला आहे. रांजणगाव गणपती येथील शेळकेवस्ती येथील किरण चंद्रकांत शेळके यांच्या घरासमोर लावलेला आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरीस गेला होता. शेळके यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात 3 फेबृवारी रोजी फिर्याद दिली. या गुन्ह्याचा समांतर तपास ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते.

गोपनीय बातमीदाराच्या मदतीने पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला असून, गुन्ह्यातील चोरीस गेलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. आरोपी दिनेश ऊर्फ दिनकर रवींद्र साळुंके (वय 38, रा. रामपूरवाडी, ता. राहता, जि. अहमदनगर) या आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करता त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार रितीक सदफळ (रा. पिंपळवाडी, तुरकणे गल्ली, ता. राहता, जि. अहमदनगर), रितीक याचा मित्र नावपत्ता माहिती नाही यांच्या मदतीने केल्याचे कबूल केले आहे.

दिनेशकडे एक बुलेट सापडली. तपास करता त्याने ही बुलेट निफाड येथून आरोपी रितीक सदफळ याच्या मदतीने मिळून चोरून आणली, असे उघड झाले आहे. आरोपीस पुढील तपासासाठी रांजणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरूर यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, हवालदार जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे यांनी ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा 

ICC World Cup 2023 : वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा

सनातन धर्मावरील उदयनिधींच्‍या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध, २६० मान्‍यवरांचे सरन्‍यायाधीशांना पत्र

Back to top button