अर्जाच्या रकान्यात आता तृतीयपंथीयांनाही स्थान ; पिंपरी चिंचवड महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय | पुढारी

अर्जाच्या रकान्यात आता तृतीयपंथीयांनाही स्थान ; पिंपरी चिंचवड महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांकडून विविध प्रकाराचे अर्ज स्वीकारले जातात. तसेच, मागविले जातात. त्या अर्जावरील लिंग या प्रकारामध्ये स्त्री आणि पुरूष असे रकाने असतात. त्या रकान्यात आता तृतीयपंथीयांनाही स्थान मिळाले आहे. तृतीयपंथी व्यक्तींना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे महापालिकेच्या विविध सोई-सुविधा देताना तसेच, लाभ देताना कागदोपत्री अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महापालिकेतर्फे स्वीकारले जाणारे किंवा मागविले जाणारे अर्ज व आवेदनपत्र भरताना त्यावर लिंग या रकानासमोर स्त्री आणि पुरूष असा पर्याय असतो. तेथे तृतीयपंथी असा पर्याय उपलब्ध नसल्याने तो तृतीयपंथीयांवर अन्याय आहे.
तृतीयपंथी हा समाजाचा घटक आहे.

त्यांनाही सन्मानाने जगण्याचा आणि महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा मूलमूत अधिकार आहे. ही बाब विचारात घेऊन महापालिकेच्या सर्व विभागांकडून अर्ज मागविताना त्या अर्जावर स्त्री, पुरूष तसेच, तृतीयपंथी असा रकाना उपलब्ध करून द्यावा, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या सर्व अर्ज व आवेदनपत्रांवर लिंग या प्रकारासमोर स्त्री, पुरुष व तृतीयपंथी असे तीन पर्यायी रकाने उपलब्ध असणार आहेत.
दरम्यान, महापालिकेने वारसा हक्कानुसार अनुकंपा तत्वावर सफाई कामगार म्हणून एका तृतीयपंथीयास कायमस्वरूपी नोकरी दिली आहे. तसेच, सुरक्षा व उद्यान विभागात कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक म्हणून नेमले आहेत. त्यांना पेन्शन योजनाही लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा :

पिंपरी : सांगवी ते बोपोडी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

Maratha Andolan : अंतरवली सराटी घटनेच्या निषेधार्थ पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन

Back to top button