पिंपरी : सांगवी ते बोपोडी पुलाचे काम अंतिम टप्प्यात | पुढारी

पिंपरी : सांगवी ते बोपोडी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदीवर सांगवी येथील दत्त आश्रम मठ ते बोपोडीतील चंद्रमणी नगर असा पूल उभारण्यात येत आहे. त्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. हा पूल जानेवारी 2024 पर्यंत बांधून तयार होईल, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. सांगवी येथील स्पायसर महाविद्यालयास जोडणार्‍या मुळा नदीवर पूल खूपच अरूंद आहे. या एक पदरी पुलावर वारंवार कोंडी होते. हे टाळण्यासाठी पालिकेकडून सांगवी ते बोपोडी असा नवा पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सांगवीतील ममतानगर दत्त आश्रम मठापासून पुणे विद्यापीठामागील चंद्रमणी नगरच्या शेजारच्या कृषी महाविद्यालयाच्या जागेत पूल उभारण्यात येत आहे. त्यासाठी 41 कोटी 63 लाख खर्चास स्थायी समितीने 11 सप्टेंबर 2021 ला मंजुरी दिली आहे. त्या पुलासाठी तत्कालिन महापौर उषा ढोरे या आग्रही होत्या.

हे काम टी अ‍ॅण्ड टी कंपनी करीत आहे. आतापर्यंत फाउंडेशनचे 100 टक्के काम झाले आहे. पिलर उभारणीचे 90 टक्के काम झाले आहे. पुलाचे एकूण 70 टक्के काम झाले आहे. कामाची मुदत 2 वर्षे आहे. येत्या नव्या वर्षांत जानेवारी महिन्यात पूल तयार होईल.

पुलामुळे पिंपरी-चिंचवड व पुणे शहर जोडले जाणार
सांगवी-बोपोडी पुलामुळे बोपोडी, पुणे विद्यापीठ, रेंजहिल्स, खडकी, औंध रस्ता या दिशेला ये-जा करणे. पुण्यातून सांगवी, नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव या भागात जाणे सुलभ होणार आहे. स्पायसर महाविद्यालय रस्त्यावर असलेला सध्याचा मुळा नदीवरील पूल एकपदरी असून, दोन्हीकडील जोडमार्ग अरूंद आहेत. त्यामुळे वर्दळीच्या वेळी वाहतुक कोंडी होते. त्या पुलास हा नवा पुल पर्यायी ठरणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला हा पूल वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

पूल 760 मीटर लांबीचा
पूल 760 मीटर लांबीचा दोनपदरी आहे. त्यांची रूंदी 18.60 मीटर आहे. सांगवीच्या बाजूने 80 मीटर व पुण्याच्या बाजूस 555 मीटरचा पोहोच रस्ता आहे. पुलावर पदपथ असून, एकूण 6 पिलर उभारले जाणार आहेत. मुळा नदीस पूर आल्यास हा पुल पाण्याखाली जाणार आहे. तो समर्जन्स पुल आहे. सीमेवर असल्याने पिंपरी-चिंचवड व पुणे महापलिका निम्मा निम्मा खर्च करणार आहे. पुलाचे बांधणी पिंपरी-चिंचवड पालिका करत आहे.

हेही वाचा :

दुर्दैवी ! मुलाच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

परभणी : सेलूत सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

Back to top button