आ. रवींद्र धंगेकर पोहोचण्यापूर्वीच समितीची बैठक संपली | पुढारी

आ. रवींद्र धंगेकर पोहोचण्यापूर्वीच समितीची बैठक संपली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाटबंधारे विभागाकडून पाठविण्यात आलेल्या वेळेनुसार कसबा पेठ विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित झाले. मात्र, तोपर्यंत बैठक संपलेली होती. त्यामुळे धंगेकर यांना बैठकीत सहभागी होता आले नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतल्याने शहरातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, तर दुसरीकडे अनेक तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी चार वाजेच्या सुमारास कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिह्यातील सर्व आमदारांना बैठकीस उपस्थितीत राहण्यासंदर्भात जलसंपदा विभागातर्फे पत्र पाठवून निमंत्रित करण्यात आले होते.

बैठकीला आंबेगाव मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, तसेच शहरातील कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते. परंतु, धंगेकर यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात पाच वाजून 50 मिनिटांची वेळ देण्यात आली होती. त्यानुसार धंगेकर साडेपाच वाजता बैठकीस आले असता, अवघ्या 15 मिनिटांत बैठक संपली असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे आमदार धंगेकर यांनी पुणेकरांच्या पाण्यासंदर्भातील मोठा प्रश्न असताना अवघ्या 15 मिनिटांत बैठक आटोपल्यामुळे नाराजी व्यक्त केली.

त्या वेळी त्यांनी प्राप्त झालेले पत्र दाखवले असता, त्यामध्ये दुपारी चार ऐवजी 5.50 वाजताची वेळ असल्याचे स्पष्ट झाले. एवढ्या कमी वेळेत बैठकीत निर्णय घेतले जात असल्यास पालकमंत्र्यांचा पाण्याचा अभ्यास दांडगा आहे. पालकमंत्री पाटील हे हेतुपुरस्सर पुण्यातील विषयांसदर्भात बोलणे टाळत आहेत. कितीही बोलणे टाळले, लपवाछपवी केली. तसेच बैठकीबाबत पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आणि चासकमान पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ना. गुंजाळ यांच्याकडून खुलासा मागवून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार धंगेकर यांनी सांगितले.

हेही वाचा

मराठा आरक्षणासाठी आजपासून राज्यभर निदर्शने

Pune Rain Update : पुन्हा आला..! 24 तासांत लोणावळा, चिंचवडमध्ये अतिवृष्टी

मराठा आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : मुख्यमंत्री

Back to top button