मराठा आरक्षणासाठी आजपासून राज्यभर निदर्शने | पुढारी

मराठा आरक्षणासाठी आजपासून राज्यभर निदर्शने

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली या गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे मराठा बांधव संतप्त झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीला धार देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने रविवारपासून पुन्हा राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील दादर येथील प्लाझा चित्रपटगृहासमोर सकाळी 11 वाजता निदर्शने करून केली जाणार आहे.

शिवाजी मंदिर येथे आयोजित केलेल्या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे नेते वीरेंद्र पवार यांनी ही माहिती दिली. जालना जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने शिवाजी मंदिरमध्ये शनिवारी संध्याकाळी तातडीने बैठक आयोजित केली होती. मुंबईतील सुमारे 400 कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत अनेक जणांनी सत्तेतील पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यास उत्सुक नसल्याची संतप्त भावना व्यक्त केली. मराठा आरक्षणासाठी पुन्हा राज्यभरात आंदोलन करण्याची मागणीही केल्यामुळे रविवारपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती वीरेंद्र पवार यांनी दिली. आंदोलन व्यापक करण्यासाठी राज्यस्तरीय बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यात निदर्शने असे या आंदोलनाचे स्वरूप असेल. तसेच शिष्टमंडळाच्या वतीने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. मुंबईत पोलिस महासंचालकांना निवेदन देऊन जालना पोलिस अधीक्षकांचाही राजीनामा मागणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button