किकवी : पाठलाग करून चार चोरट्यांना पकडले ; ७ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

किकवी : पाठलाग करून चार चोरट्यांना पकडले ; ७ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त

नसरापूर (पुणे) : पुढारी वृत्तसेवा:  पुणे-सातारा महामार्गावरील एका कंपनीतील मुद्देमाल पिकअपमध्ये (एमएच १२ एसएक्स ०१९७) भरून पळून जाणाऱ्या चोरट्यांना किकवी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. पोलिसांनी चार आरोपींकडून पिकअपसह एकूण ७ लाख १६ हजारांचा ऐवज जप्त केला. आरोपींना भोर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. बाळासाहेब हनुमंत साळुखे (वय ३२), सुमीत विनोद शिंदे (वय २४), भूषण विठ्ठल शिंदे (वय २८, तिघेही रा. पाॅवर हाऊस, फुरसुंगी, ता. हवेली), विजय संजू म्हस्के (वय २२, रा. बिबवेवाडी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

धांगवडी (ता. भोर) येथील फायबर फील तयार करणाऱ्या आर. के. इंडस्ट्रीज कंपनीमध्ये शनिवारी (दि. २) पहाटे सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी कंपनीच्या स्टोअर रूममधील ६ मोटारी, फायबर शीट कार्डिंगची मशिन तसेच तांब्याच्या तारा असा ४ लाख ८१ हजार किमतीचा मुद्देमाल पिकअपमध्ये भरला. यादरम्यान महामार्गावर गस्तीवर असणारे पोलिस नाईक मयूर निंबाळकर यांना कंपनीच्या बाहेर अंधारात पिकअप उभी असल्याची दिसली. त्यांनी उपनिरीक्षक विनय झिंजुर्के यांना याबाबत कळविले. झिंजुर्केसह हवालदार राजेंद्र चव्हाण, नाना मदने, योगेश राजीवडे, गणेश लडकत घटनास्थळी पोहचले.

पोलिसांची चाहूल लागताच चोरटे कापूरव्होळच्या दिशेने पळाले. पिकअप घेऊन जात असतानाच सर्व्हिस रोड व मेन रोडच्या मध्येच पोलिसांनी चालकाला पकडले. पळून गेलेल्या चोरट्यांना स्थानिक तरुण मिलिंद जगताप, रामदास जगदाळे आदींच्या मदतीने पोलिसांनी पाठलाग करून पकडले. यतीराज खंडेलवाल यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तीन दिवसांपूर्वी नसरापूर, केंजळ आदी परिसरात झालेल्या घरफोडीत सदर आरोपींचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

Sharad Pawar : एकीकडे चर्चा, तर दुसरीकडे लाठीचार्ज; शरद पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

माउंट मेरू शिखर काबिज करत पुणेकरांनी घडवला इतिहास

Back to top button