पुणे : कालवा समितीची आज होणार बैठक; पाणीकपात विषयावरून उलटसुलट चर्चा

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने खडकवासला धरणसाखळीत गतवर्षीच्या तुलनेत दीड टीएमसी पाणी कमी आहे. या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक होत आहे. यानिमित्त शहराच्या पाणीकपातीवर उलटसुलट चर्चा सुरू असून, बैठकीकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. जूनच्या शेवटच्या टप्प्यात बर्‍यापैकी पाऊस पडू लागल्याने धरणांतील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला. या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यात शेतीच्या पेरण्याही झाल्या. परंतु, पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने जुलैअखेर 80 टक्क्यांवर भरणार्‍या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा साठा झाला नाही. परिणामी, उजनी धरणासाठी पाणी सोडण्यात आले नाही.

ऑगस्टमध्येही सरासरीच्या तुलनेत निम्माच पाउस झाल्याने परिस्थिती आणखी बिघडली. एकीकडे जलसंपदा विभागाने पानशेत आणि वरसगाव धरण शंभर टक्के भरल्यानंतर पाणी सोडण्याची घोषणा केली. परंतु, खडकवासला धरणातून कालव्याद्वारे शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडल्यानंतर पानशेत धरणातून आलेले पाणी खडकवासला धरणातच अडविण्यात आले. आजमितीला धरण-साखळीतील पानशेत आणि वरसगाव ही मोठी धरणे पूर्ण भरली असून, टेमघर आणि खडकवासला धरणांमध्ये शंभर टक्के साठा झालेला नाही.

चारही धरणांमध्ये मिळून 29.10 टीएमसी पाणीसाठा असून, गतवर्षीच्या तुलनेत दीड टीएमसी कमी आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस होणारी कालवा समितीची बैठक दोन महिने अगोदरच होत आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असला तरी शहराला वर्षभर पुरेल इतका साठा आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या कपातीची मागणी बैठकीत करणार नाही.

सध्याचा पाणीसाठा
खडकवासला ः 56.22 टक्के
पानशेत ः 100 टक्के
वरसगाव ः 100 टक्के
टेमघर ः 80.03

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news