कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे 2022-23 मधील क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. यात कोल्हापूरच्या चार शिक्षकांचा समावेश आहे.

नि:स्वार्थी भावनेने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. 2022-23 च्या पुरस्काराच्या अंतिम निवडीसाठी नुकतीच बैठक झाली. यात शिक्षकांची प्रवर्गनिहाय निवड यादी तयार करून शासनास सादर करण्यात आली. यातून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व अन्य माध्यमातील मिळून 108 शिक्षकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

भुदरगड तालुक्यातील विद्यामंदिर बशाचामोळा येथील सहायक शिक्षक सचिन कुंडलिक देसाई व करवीर तालुक्यातील कसबा आरळे पोस्ट घानवडे येथील माध्यमिक विद्यालयातील सहायक शिक्षक सुधीर आप्पया आमणगी यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. करवीर तालुक्यातील विद्यामंदिर बाचणी येथील सहायक शिक्षिका नकुशी पांडुरंग देवकर यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला. विशेष क्रीडाशिक्षक पुरस्कार हा मिणचे येथील स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजमधील सहायक शिक्षक शिवाजी पांडुरंग पाटील यांना जाहीर झाला आहे. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ 5 सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे.

Back to top button