

पुणे : स्टेप ऑन ग्लोबल कंपनीच्या संचालकाने एजंटच्या मदतीने कंपनीची 10 लाख 1 हजार 932 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी किरण हिम्मतराव मोरे (वय 38, रा. बंडगार्डन रोड) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवयानी खरे, प्रांजल गायकवाड आणि इतर जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 2 नोव्हेंबर 2021 मध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण मोरे, चेतन चुटे आणि आरोपी देवयानी खरे यांनी मिळून 2017 मध्ये स्टेप ऑन ग्लोबल कंपनीची स्थापना केली. परदेशातील युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना अॅडमिशन मिळून देण्याचे काम ही कंपनी करते. एका विद्यार्थ्यांचे अॅडमिशन झाल्यास 20 टक्के कमिशन कंपनीला मिळत असे. तर कंपनीने नेमून दिलेल्या एजंटने एखादा विद्यार्थी अॅडमिशनसाठी आला तर त्याला 12 टक्के कमिशन द्यावे लागत असे. उर्वरित 8 टक्के रक्कम ही कंपनीला मिळत असे.
थेट कंपनीच्या माध्यमातून एका विद्यार्थ्याला परदेशात अॅडमिशन मिळाले होते. मात्र, आरोपी देवयानी खरे, प्रांजल गायकवाड यांनी हे अॅडमिशन एजंटकडून मिळल्याचे मेलमध्ये छेडछाड करून कंपनीला दाखवले. तसेच कमिशन म्हणून एजंटच्या खात्यावर वळवून कंपनीची 10 लाख 1 हजार 932 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच कंपनीचा मेल आयडीचा पासवर्ड परस्पर बदलून फिर्यादी आणि चेतन चुटे यांना कंपनीचे काम करण्यापासून परावृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सावंत करत आहेत.
हेही वाचा