Pune Accident : भावाला राखी बांधायला निघाली अन् रस्त्यातच काळाने घातला घाला; खडकवासला धरणात बुडून 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-पानशेत रस्त्यावरील पानशेत कुरण खुर्द परिसरात खडकवासला धरणात कार कोसळून झालेल्या दुर्घटनेत संस्कृती प्रदीप पवार (वय 12, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड) हिचा मृत्यू झाला. पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर बुधवारी (दि. 30) रात्री साडेअकराच्या सुमारास अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोटारीमधील इतरांना वाचविण्यात मयत मुलीचे वडील प्रदीप सोमनाथ पवार (वय 42) व स्थानिक नागरिकांना यश आले. मात्र, मुलीला वाचवता न आल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. रक्षाबंधनासाठी पवार हे पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न, मुलगी संस्कृती व बहीण सुनीता नारायण शिंदे यांच्यासह मोटारीने नांदेड सिटी येथून पानशेत येथे जात होते. कुरण खुर्दजवळ टायर फुटल्याने पवार यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर मोटार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली होती.
पवार चालू मोटारचा दरवाजा उघडून बाहेर आले. पाण्याच्या प्रवाहामुळे मोटार पाण्यात बुडू लागली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलगा, पत्नी व बहिणीला कारमधून बाहेर काढले. मात्र, संस्कृती मोटारीमध्येच होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री साडेअकराच्या सुमारास मोटार पाण्याबाहेर काढली. त्या वेळी मोटारीत संस्कृती मृत अवस्थेत आढळून आली.
हेही वाचा
Philippines : कपड्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ३ जखमी
‘अशांत’ देशातील पहिली रणरागिणी
पुणे-मुंबई महामार्ग उद्या दोन तास बंद; जुन्या महामार्गावरून वाहतूक वळवली