स्वतःच्या घरात राहण्याचे स्वप्न अपूर्णच; काळीज पिळवटून टाकणारी घटना | पुढारी

स्वतःच्या घरात राहण्याचे स्वप्न अपूर्णच; काळीज पिळवटून टाकणारी घटना

संतोष शिंदे

पिंपरी(पुणे) : तब्बल सतरा वर्षे दुकानात दाटीवाटीने संसार केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत चौधरी कटुंबीय स्वतःच्या घरात राहण्यासाठी जाणार होते. मोशी परिसरात त्यांच्या नव्या घराचे बांधकामही अंतिम टप्प्यात आले होते. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. बुधवारी (दि. 30) पहाटेच्या सुमारास कुटुंबीय साखर झोपेत असताना अचानक आग लागली अन चौधरी दाम्पत्यासह दोन चिमुरड्यांचा अक्षरशः कोळसा झाला. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना चिखली येथे उघडकीस  आली.
चिमणाराम वनाजी चौधरी (48), नम्रता उर्फ ज्ञानूदेवी चिमणाराम चौधरी (44), सचिन उर्फ चिकू चिमणाराम चौधरी (10), भावेश चिमणाराम चौधरी (13, सर्व रा. पूर्णानगर, चिखली) अशी होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.  याबाबत सविस्तर वृत्त असे की, चौधरी कटुंबीय मूळचे राजस्थान येथील पाली जिह्यातील एका छोट्या खेड्यातील रहिवासी आहेत. दरम्यान, चिमणाराम मागील सतरा वर्षांपूर्वी शहरात आले. त्यांनी चिखली येथील एका दुकान भाड्याने घेऊन हार्डवेअरचे दुकान सुरु केले होते. खोली भाड्याचे पैसे वाचवण्यासाठी चिमणाराम यांनी दुकानातच संसार थाटला. त्यासाठी दुकानाच्या पोटमाळ्यावर जागा करण्यात आली होती.
दिवसभर दुकानात काम केल्यानंतर चौधरी दाम्पत्य दुकानातच राहत होते. दरम्यान, चौधरी दाम्पत्यांच्या संसार वेलीवर सचिन आणि भावेश ही दोन फुले उमलली. दुकानात जागा कमी पडत असली तरीही चिमणराम यांनी पोटाला चिमटा काढत काटकसर सुरूच ठेवली. शहरात स्वतःचे घर असावे, असे स्वप्न ते उराशी बाळगून होते. यासाठी ते दिवसभर पै- पै जोडून अतिशय प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करीत होते.
तब्बल पंधरा वर्षे काबाडकष्ट केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी चिमणाराम यांनी मोशी परिसरात एक गुंठा जमीन खरेदी केली. त्यानंतर तेथे बांधकाम सुरु केले. तळ मजल्यावर दुकान आणि त्यावर स्वतःसाठी प्रशस्त घर, असा प्लॅन त्यांनी आखला होता. घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आल्याने चिमणराम यांनी दुकानमालकाला आपण काही दिवसात दुकान सोडणार असल्याचे सांगितले होते.
स्वतःच्या घरात राहण्यासाठी जायचे असल्याचे चौधरी कुटुंबीय अतिशय आनंदी होते. दरम्यान, मागील आठवड्यात त्यांना एका ऑइल पेंट कंपनीने उत्तम व्यवसाय केल्याबाबत सहकुटुंब काश्मीरच्या सहलीचे तिकीट बक्षीस म्हणून दिले. काश्मीरची सैर करून ते सोमवारी (दि. 28) रात्री दुकानात परतले होते. त्यानंतर आराम केल्यानंतर मंगळवारी त्यांनी नेहमीप्रमाणे दिवसभर दुकान उघडले. जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या शेजार्‍यांशी त्यांनी गप्पा मारल्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते झोपी गेले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दुकानात अचानक आग लागली. या आगीत चौधरी कटुंबीयांचा भाजून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला.

चिमुरड्यांच्या चेहर्‍यावरील आनंद टिकला नाही

काश्मीरची सैर करून आल्यानंतर चौधरी दाम्पत्य अतिशय आनंदी होते. चिमणाराम काश्मीरचे फोटो दाखवून आपल्या शेजार्‍यांना तेथील अनुभव सांगत होते. काश्मीर ट्रीपमुळे सचिन आणि भावेश यांचा आनंद गगनात मावत नव्हता. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. दुसर्‍याच दिवशी संपूर्ण चौधरी कुटुंबीय जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त केली जात होती.

खेळ कुणाला दैवाचा कळला…!

चौधरी कुटुंबियांनी अतिशय चिकाटीने व्यवसाय करीत बाजारात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते. काबाडकष्ट करून जमा केलेली रोकड त्यांनी घराच्या बांधकामासाठी काढून आणली होती; मात्र ज्या पैशासाठी आयुष्यभर कष्ट केले. तेच पैसे देखील त्यांच्या सोबतच जळून खाक झाले. घटनास्थळी नोटांचे जळालेले तुकडे पाहून खेळ कुणाला दैवाचा कळला, अशाच काहीशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
आई राखी बांधण्यासाठी जाणार होती
मामा, मामी आणि मुलांचा मृत्यू झाल्याचे समजल्याने आईला मोठा धक्का बसला आहे. रक्षाबंधन साजरे करण्यासाठी आई संध्याकाळी मामाकडे जाणार होती. मात्र, सकाळीच ही घटना समजल्याने आईसह आमच्या कटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
– प्रवीण चौधरी, मृत चिमणाराम चौधरी यांचा भाचा  
हेही वाचा

Back to top button