पुणे : निवृत्तिवेतनासाठी दोन वर्षे झगडावे लागते…. | पुढारी

पुणे : निवृत्तिवेतनासाठी दोन वर्षे झगडावे लागते....

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या विविध खात्यांतील निवृत्त कर्मचार्‍यांची तब्बल 493 निवृत्तिवेतनाची प्रकरणे महापालिका प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. महापालिकेच्या सेवानिवृत कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर दोन-दोन वर्षे निवृत्तिवेतनासाठी (पेन्शन) झगडावे लागत आहे. त्यामुळे आता ही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी प्रलंबित पेन्शन प्रकरणाबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे हे 31 ऑगस्टला आढावा घेणार आहेत.

महापालिकेकडे प्रलंबित असलेल्या पेन्शनच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक प्रकरणे ही प्राथमिक शिक्षण विभागाची आहेत. या विभागाकडे सुमारे 115 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याखालोखाल आरोग्य विभागाकडे 37 प्रकरणे प्रलंबित आहेत. पाणीपुरवठा विभागाकडे 41 प्रकरणे प्रलंबित आहेत. कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय 32, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे 18, शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय 19, येरवडा, कळस, धानोरी क्षेत्रीय कार्यालय 23, अशी ऐकून विविध खात्यांतील 493 पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहेत.त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना पेन्शनसाठी दोन दोन वर्षे झगडावे लागत आहे.

यातही वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील कर्मचारी तर सेवानिवृत्त झाल्यावर पूर्णपणे पेन्शनवर अवलंबून असतात. त्याच कर्मचार्‍यांची संख्या पालिकेत जास्त आहे. यातील काही कर्मचार्‍यांना दोन वर्षांनंतरदेखील पेन्शन मिळत नाही. यासाठी पालिकेत वारंवार चकरा माराव्या लागतात. बर्‍याच कर्मचार्‍यांना उतारवय असल्याने वेगवेगळे आजार जडलेले असतात, त्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता असते. मात्र तो वेळेवर मिळत नाही.

पुन्हा एकदा बैठक
कर्मचार्‍यांची प्रकरणे मार्गी लागण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी यापूर्वीदेखील एक बैठक घेऊन सर्व खात्यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर ही प्रकरणे मार्गी लावण्यासाठी 13 कर्मचारी लेखापरीक्षण विभागाकडे उपलब्ध करून दिले होते. या कर्मचार्‍यांनी 31 जुलैपर्यंत प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करायचा होता. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे हे खातेप्रमुखांची बैठक घेणार आहेत.

हेही वाचा :

आनंदाची बातमी ! अ‍ॅनिमियाने माता मृत्यूचे प्रमाण अत्यल्प

नाशिक : शरद पवार गटाची कार्यकारिणी घोषित, १२ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

Back to top button