आनंदाची बातमी ! अ‍ॅनिमियाने माता मृत्यूचे प्रमाण अत्यल्प | पुढारी

आनंदाची बातमी ! अ‍ॅनिमियाने माता मृत्यूचे प्रमाण अत्यल्प

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात गेल्या सहा वर्षांमध्ये सहा हजार गर्भवती महिलांचा अ‍ॅनिमिया, रुग्णवाहिकेची सुविधा न मिळणे, अपुर्‍या दिवसांची प्रसूती, घरी प्रसूती होणे, अशा कारणांमुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर शहरातील स्थितीचा अभ्यास केला असता, अ‍ॅनिमियामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. शहरात एकही प्रसूती घरी झालेली नाही. कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे सर्व महापालिकांमधील गर्भवती महिलांच्या मृत्यूबाबतचा अहवाल मागवण्यात आला होता. त्या वेळी पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील 2017-18 ते 2022-23 या सहा वर्षांचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

गेल्या सहा वर्षांमध्ये शहरात 495 गर्भवतींचे मृत्यू झाले. त्यापैकी एकही घटना रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने किंवा घरीच प्रसूतीदरम्यान घडलेली नाही. अ‍ॅनिमियामुळे 12 गर्भवतींचा मृत्यू झाला. माता मृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या लक्ष्य कार्यक्रमांतर्गत गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी निवडण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील तीन रुग्णालयांपैकी पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय आणि सोनवणे प्रसूतिगृह या दोन्ही रुग्णालयांनी पात्रतेचे निकष पूर्ण केले आहेत. सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये प्रसूती झालेल्या प्रत्येक गर्भवती महिला आणि नवजात बालकांना लाभ मिळावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या मूल्यांकन पथकाने दोन दिवस बारकाईने केलेल्या तपासणीनंतर प्रमाणपत्र देण्यात आले, अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव
यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, मातृत्व अनुदान योजना, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना इत्यादी योजना महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा :

धक्कादायक ! कर्मचारीच जेलभेदी ; कैद्यांना पुरविला मोबाईल

नाशिक : शरद पवार गटाची कार्यकारिणी घोषित, १२ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

Back to top button