Pune : सायबर चोरट्याला हरियाणातून बेड्या | पुढारी

Pune : सायबर चोरट्याला हरियाणातून बेड्या

पुणेः पुढारी वृत्तसेवा :   नोकरीच्या आमिषाने पुण्यातील एका व्यक्तीला आर्थिक गंडा घालणार्‍या सायबर चोरट्याला पुणे पोलिसांनी गुडगाव हरियाणा येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून एक लॅपटॉप, तीन मोबाईल आणि फसवणुकीतील रक्कम 12 लाख रुपये हस्तगत करण्यात आली आहे. जयंतकुमार मलिक पुत्र श्री परमानंद मलिक (वय 29, रा. पालमविहार गुडगाव, हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. परदेशात नोकरीच्या आमिषाने पुण्यातील एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी 11 लाख 91 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला होता.

याप्रकरणी, शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. शालिनी शर्मा आणि करण सिंग ही नावे वापरून फिर्यादींना परदेशातील नामांकित कंपनीत नोकरीचे प्रलोभन दाखविण्यात आले होते. त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. मात्र, पैसे भरूनदेखील नोकरी मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर फिर्यादींना फसवणूक झाल्याचे समजले.

सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे मलिक याचा पत्ता शोधून काढला. तो हरियाणा गुडगाव येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला 24 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला पुण्यात घेऊन आल्यानंतर येथील न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, उपनिरीक्षक सचिन जाधव, संदीप कदम, कर्मचारी राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, नीलेश लांडगे, रेणुका राजपुत, नीलम नाईकरे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा :

दुर्दैवी ! हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू

राज्य क्रीडा दिनाला सहा वर्षांनी मिळाला’न्याय’

Back to top button