बारामतीत भीषण अपघात; डंपरच्या धडकेत वडील ठार | पुढारी

बारामतीत भीषण अपघात; डंपरच्या धडकेत वडील ठार

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील सोनगाव येथे माल वाहतूक करणाऱ्या हायवाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात सतीश रामदास पवार (वय ३८, रा. आसू, ता. फलटण, जि. सातारा) हे ठार झाले. त्यांचा मुलगा आर्यन (वय १२) हा या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हायवा वाहन (एमएच-४२, एअो-८२५५) ने दुचाकी (एमएच-११, सीएस-७४७२) ला धडक दिली. त्यात सतीश हे ठार झाले. तर मुलगा आर्यन हा जखमी झाला. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी हवालदार गणेश पवार यांना घटनास्थळी रवाना केले. हा हायवा बारामतीतील डी. पी. जगताप अॅण्ड कन्स्ट्रक्शनचा आहे.

बारामती-वालचंदनगर या रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे वेगाने वाहने या रस्त्यावरून ये-जा करत आहेत. त्यात अनेकदा मोठे अपघात होत आहेत. अनेकांना जीव गमवावा गालत आहे. सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी ग्रामपंचायतीने अनेकदा या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत अशी मागणी केली आहे. त्यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु गतिरोधक बसविण्यास टाळाटाळ केली जात आहे. याला सर्वस्वी संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी आणि या रस्त्याचे ठेकेदार जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोनगावचे कुंदन देवकाते व झारगडवाडीचे सरपंच अजित बोरकर यांनी केली.

हेही वाचा

नाशिक : लष्करी जवानांचे गाव अन् रस्त्याचा नसे ठाव, लोहशिंगवे गावची व्यथा

हिंगोली : कावड यात्रेत आमदार बांगरांनी नाचवल्या तलवारी; गुन्हा दाखल

पिंपरी : 357 होर्डिंगचालकांना महापालिकेची नोटीस

Back to top button