कोंढवा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात मीठानगर येथील बाजारात विक्रेते व ग्राहकांच्या डोक्यावर झाडाची फांदी कोसळून अपघात झाला. परंतु, सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मात्र, महापालिका प्रशासनाकडून धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का? असा सवाल यानिमित्ताने नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कोंढवा, वानवडी परिसरातील रस्त्यांच्या बाजूला असणार्या झाडांच्या फांद्या धोकादायक झाल्या असल्याचे वृत्त दै. 'पुढारी'ने गेल्या काळात प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने परिसरातील पावसाळापूर्व कामे हाती घेतली. मात्र, काही भागात झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.
गेल्या आठवड्यात कोंढवा खुर्द परिसरातील मीठानगरमधील भाजी मंडईत अचानक पिंपळाच्या झाडाची फांदी ग्राहक आणि विक्रेत्यांच्या डोक्यावर पडली. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. या पार्श्वभूमीवर तरी प्रशासनाने धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्याची त्वरित खरदारी घ्यायला हवी होती. इमारतींच्या चौथ्या पाचव्या मजल्यांच्या खिडक्यांपर्यंत झाडांच्या फांद्या पोहचल्या आहेत. हा धोक्याचा इशारा असूनदेखील त्यावर उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिवरकर रस्ता व बापूसाहेब केदारी रस्ता येथील झाडे खूप उंच वाढली असून, त्यांच्या फांद्या धोकादायक झाल्या आहेत. त्या कधीही रस्त्यांवर पडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्यासाठी नागरिक उद्यान विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
वानवडी व कोंढवा परिसरातील झाडांच्या धोकादायक फांद्याची लवकरच पाहणी केले जाईल. त्यानंतर त्या छाटण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल.
-अशोक घोरपडे, अधिकारी, उद्यान विभाग, महापालिका
हेही वाचा