फळभाज्यांची स्वस्ताई ! कांदा, टोमॅटो, काकडी, कारली, दोडका, वांगी, ढोबळी मिरची, घेवडा स्वस्त

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात फळभाज्यांची वाढलेली आवक कायम आहे. रविवारी (दि. 27) परराज्यांसह पुणे विभागातून 110 ट्रकमधून फळभाज्या विक्रीसाठी दाखल झाल्या. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने टोमॅटोसह कांदा, काकडी, कारली, दोडका, वांगी, ढोबळी मिरची, घेवड्याच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली.
टोमॅटोच्या नवीन लागवडीचे उत्पादन सुरू होऊन आवक वाढल्याने घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात किलोमागे दहा रुपयांनी घसरण झाली. बाजारात दहा किलो टोमॅटोचे भाव 100 ते 200 रुपयांवर पोहचले. तर, किरकोळ बाजारात 30 ते 40 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू होती. सरकारने जारी केलेल्या धोरणांमुळे कांद्याच्या दरातही दहा टक्क्यांनी घसरण झाल्याची माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी सुमारे 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, इंदूर येथून 6 ते 7 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 4 ते 5 टेम्पो, गुजरातेतून भुईमुगाच्या शेंगा 1 टेम्पो, तर मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 8 ते 10 टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेत सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, गवार 6 ते 7 टेम्पो, भेंडी 6 ते 7 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, टोमॅटो सुमारे 9 ते 10 हजार क्रेट, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, ढोबळी मिरची 14 ते 15 टेम्पो, काकडी 10 ते 12 टेम्पो, भुईमूग शेंगा सुमारे 100 ते 125 गोणी, पुरंदर, वाई सातारा येथून मटार 7 ते 8 टेम्पो, कांदा 100 ट्रक, इंदूर, आग्रा भागातून बटाटा 40 ते 45 ट्रक आवक झाली होती.
मेथी वगळता अन्य पालेभाज्यांतील स्वस्ताई टिकून
रविवारी बाजारात कोथिंबिरीची सव्वा लाख तर मेथीची पन्नास हजार जुडी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक 25 हजार तर मेथीची आवक 20 हजार जुड्यांनी घटली. बाजारात मेथीच्या गड्डीला मागणी वाढल्याने त्याच्या भावात गड्डीमागे पाच रुपयांनी वाढ झाली. अन्य पालेभाज्यांची आवक-जावक कायम राहिल्याने गत आठवड्यातील दर टिकून होते.
हेही वाचा :
नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांमध्ये राबविणार जलयुक्त शिवार २.०
लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार? टोलवसुलीवर किशोर कदम यांचा परखड प्रश्न