भोसरीत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता! | पुढारी

भोसरीत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता!

भोसरी(पुणे) : परिसरात स्थापत्य विभागाचा भोंगळ कारभाराचा फटका करदात्या नागरिकांना सोसावा लागत आहे. परिसरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण त्वरित करावे, अशी मागणी भोसरीतील नागरिकांसह वाहनचालकांकडून केली जात आहे.

अपघातांचे प्रमाण वाढले

भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणात रस्ते काँक्रिटीकरण सुरू आहे. परंतु, परिसरातील मुख्य रस्त्यावर तसेच प्रभागातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचा नाहक बळी जात आहे. परंतु, प्रशासन कायमस्वरूपी तोडगा काढत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दरवेळी तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करत असल्याचे तसेच लवकरच याठिकाणी रास्ता काँक्रिटीकरण होणार असल्याचे सांगून वेळ मारून नेत असल्याने नागरिक स्थापत्य विभागाचा कारभाराचा संतप्त व्यक्त करीत आहेत.

परिसरात वाहतूककोंडी

राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालील चांदणी चौक येथे मोठ्या खड्डा पडला आहे. हा रास्ता अतिशय वर्दळीचा व रहदारीचा आहे. रात्रंदिवस या मार्गावरून अवजड वाहनांसह पीएमपी बस, लहान-मोठी चारचाकी वाहने, दुचाकींसह इतर वाहनांची रहदारी सुरू असते. वाहनचालकांना रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांना आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविताना दररोज अपघात घडत आहेत.

वाहनांचे नुकसान

या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात दररोज अनेक वाहने आदळत आहेत. अनेकजण जायबंदी झाले आहे. संबंधित विभाग निवेदने दिल्याशिवाय कुठलीही दखल स्वतः घेत नाही. त्यामुळे या खड्ड्यात एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा संबंधित विभाग पाहतो का?, असाही सवाल आता नगरिकाकडून उपस्थित केला जात आहे. परिसरातील रस्त्यांची लवकरच दुरुस्ती करण्यात येइल, असे स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता विनय जगताप यांनी सांगितले.

स्थापत्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे. नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण झाले आहे. वळणावर खड्डा पडला आहे. तरीही संबंधित विभागाच्या हे लक्षात येत नाही.

– संदीप पाळंदे,
नागरिक

हेही वाचा

लावणी अन् ढोलकीचा वारसा पुढील पिढ्यांकडे नेणे गरजेचे : मनोहर उत्पात

पारगाव : ऐन श्रावणात झेंडूच्या बागा उपटल्या

डिंभा उजव्या कालव्याला भगदाड

Back to top button