पारगाव : ऐन श्रावणात झेंडूच्या बागा उपटल्या | पुढारी

पारगाव : ऐन श्रावणात झेंडूच्या बागा उपटल्या

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  झेंडूच्या फुलांना सध्या कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. तोडणी, मजुरी, वाहतुकीचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्वेकडील भागातील शेतकर्‍यांनी झेंडूच्या फुलांच्या बागा उपटून टाकल्या आहेत. श्रावण महिन्यातील सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलांना बाजारभाव चांगला मिळेल, या आशेने थोरांदळे, रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे, पारगाव, काठापूर आदी गावांमधील शेतकर्‍यांनी झेंडूच्या फुलांचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले आहे.

परंतु या फूल उत्पादक शेतकर्‍यांची यंदाही निराशाच झाली. यंदाही झेंडूच्या फुलांना समाधानकारक बाजारभावाची साथ मिळालीच नाही. सध्या श्रावण महिना सुरू आहे. सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या काळात झेंडूच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळतो याच काळात दर कोसळले आहेत. व्यापार्‍यांनीदेखील झेंडूच्या फुलांच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

पिकांसाठी भांडवल गुंतवायचे कसे ?
पावसाने फिरवलेली पाठ, त्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या काळात बाजारभाव वाढण्याऐवजी सर्वच शेतमालांचे बाजारभाव घसरले आहेत. टोमॅटोनंतर कांद्याचेही बाजारभाव आता घसरले आहेत. आता झेंडूच्या फुलांचेही दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मोठ्या पिकांना भांडवल गुंतविण्याच्या मनस्थितीत शेतकरी नाही.

हेही वाचा :

पोलिस अधिकारी,कर्मचार्‍यांनी गुणवत्ता वाढवावी : उपमुख्यमंत्री अजित पवार

सनी देओलला जो न्याय तो नितीन देसाईंना का नाही : संजय राऊत यांचा सवाल

Back to top button