कुंडमळ्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला | पुढारी

कुंडमळ्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

तळेगाव स्टेशन(पुणे) : शेलारवाडीजवळील कुंडमळा येथे गुरुवारी (दि. 24) वाहून गेलेल्या आणखी एकाचा मृतदेह शनिवारी सापडला आहे. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील रांजणखळगे पाहण्यासाठी आलेल्या चार महाविद्यालयीन युवकांपैकी दोघेजण गुरुवारी वाहून गेले होते. त्यातील एका युवकाचा मृतदेह शोधण्यात गुरुवारी शोधण्यात पोलिस प्रशासन, वन्यजीवरक्षक मावळ, शिवदुर्गमित्र लोणावळा व तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना यश आले होते.

अनिकेत वर्मा (वय 17) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. तर, अशोक गुलाब चव्हाण (वय 17, रा. चिंचवड) पाण्यात वाहून गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 24) सकाळी चिंचवड येथील श्रीमती गेंदेबाई ताराचंद चोपडा ज्युनियर कॉलेजमधील 8 ते 9 मित्र वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी कुंडमळा येथे आले होते. दोघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने वाहून गेले. गुरुवारी (दि.24) सकाळी साडेदहापासून ते रात्री 7 वाजेपर्यंत ही शोधमोहीम सुरू होती.

अथक प्रयत्नानंतर अनिकेत वर्मा या युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले. गुरुवारी अंधार झाल्यामुळे अशोक चव्हाण याची शोधमोहीम थांबविण्यात आली होती. शुक्रवारी (दि. 25) परत शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागू शकला नाही. शनिवारी (दि. 26) सकाळी शोधमोहीम सुरू केल्यानंतर अशोक चव्हाण याचा मृतदेह सापडला.

हेही वाचा

कामशेतमध्ये ढोल-ताशांचा आवाज लागला घुमू

तळेगाव स्टेशन : अतिउत्साहामुळे पर्यटकांचा जातोय जीव

पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांना वेग; आंदर मावळात भातपीक जोमात

Back to top button