पिंपरी : टास्कच्या बहाण्याने साडेसोळा लाखांची फसवणूक
पिंपरी(पुणे) : ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एकाची सोळा लाख 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 22 ते 23 ऑगस्टदरम्यान म्हाळुंगे येथे उघडकीस आली. या प्रकरणी अनुप केशवराव मोहोड (38, रा. आलडिया पुराणिक सोसायटी, म्हाळुंगे) यांनी शुक्रवारी (दि. 25) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना यूट्यूब चॅनेलच्या एका टास्कसाठी 50 रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. सुरुवातीला काही टास्क पूर्ण केल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या खात्यात पैसे जमा करून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना आणखी टास्क करण्यास प्रवृत्त केले.
दरम्यान, आरोपींच्या सांगण्यानुसार फिर्यादी यांनी टास्क पूर्ण केले. मात्र, तुमचे टास्क पूर्ण झाले नाहीत, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, तुम्हाला आणखी टास्क पूर्ण करावे लागतील, असे सांगून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी सोळा लाख 40 हजार रुपये घेतले. तपास पोलिस उपनिरीक्षक काकडे करीत आहे.
हेही वाचा