महापालिका निवडणुकीत युतीचा निर्णय स्थानिक पदाधिकार्‍यांवर अवलंबून : अजित पवार

महापालिका निवडणुकीत युतीचा निर्णय स्थानिक पदाधिकार्‍यांवर अवलंबून : अजित पवार

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना महायुतीत लढणार आहे, तर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक स्थानिक पदाधिकारी जो निर्णय घेतील, त्यानुसार स्वबळावर किंवा महायुतीत लढली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.25) जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांपासून वेगळे होत अजित पवार हे आपल्या सहकारी आमदारांसह एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये 2 जुलैला सामील झाले. त्यानंतर प्रथमच ते पिंपरी-चिंचवड शहराच्या दौर्‍यावर आले होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, राहुल भोसले, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, पदाधिकारी, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते. त्यांचा सत्कार करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अक्षरश: झुंबड उडाली होती.

अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा व विधानसभा निवडणूक भाजप व शिवसेनेसोबत लढणार आहे. तर, स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका स्थानिक पदाधिकार्यांच्या निर्णयावर अंवलबून असेल. काँग्रेस आघाडीत असताना ज्याप्रमाणे जागा वाटप होत होते, त्यानुसारच होईल. स्थानिक पदाधिकार्यांच्या निर्णयानुसार स्वबळावर किंवा युतीत लढू.

त्या त्या ठिकाणच्या पक्षाच्या ताकदीनुसार चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या सुरू असलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भात अंतिम सुनावणीनंतर महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्राधिकरणातील बाधित शेतकर्यांना 12.50 टक्के परतावा देण्याचा मुद्दा प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या काळापासून सुरू आहे. संपूर्ण राज्याचा विचार करून धोरण ठरविले जाते. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, या पूर्वी त्याचे रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, मोरवाडी, पिंपरी येथे जोरदार स्वागत करण्यात आले. भला मोठा पुष्पहार अर्पण करून तसेच, फुलांचा वर्षाव करून त्यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी रस्त्यांच्या दुर्तफा गर्दी केली होती.

आम्ही विचारधारा सोडली नाही

भाजपसोबत गेल्याने आम्ही विचारधारा सोडल्याचा आरोप केला जात असल्याबद्दल ते म्हणाले की, आम्ही विचारधारा सोडलेली नाही. शाहू, फुले, आंबेडकर विचारासोबतच आम्ही कायम आहोत. तो विचार समाजाला विचार देणार आहे. सर्वांना सुरक्षित वाटले पाहिजे. त्यामुळेच सर्व जातीधर्माचे आमदारांना मंत्री करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

चांगले रस्ते वापरता तर टोल द्यावात लागेल

गेल्या आठ ते दहा वर्षांत देशभरात व राज्यात चांगले प्रशस्त रस्ते झाले आहेत. अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यामुळे इंधनासह वेळ वाचतो. खासगी कंपन्या बँकेचे कर्ज घेऊन रस्ते तयार करतात. त्यामुळे टोल द्यावाच लागेल. काही ठिकाणचे टोल सरकारने बंद केले आहेत, असे अजित पवार म्हणाले.

निगडीपासून मेट्रोने थेट कात्रजचा बोगद्यात जाता येईल

निगडीपर्यंत मेट्रो कधी धावणार असा प्रश्न एका कार्यकर्त्यांने उपस्थित केल्यानंतर ते म्हणाले की, राज्य व केंद्राकडून त्या मार्गासाठी निधी मंजुर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर निगडीपासून स्वारगेट आणि कात्रजच्या बोगद्यापर्यंत मेट्रोने सुरक्षितपणे जाता येईल, असे सांगतात सभागृहात हास्या पिकला.

महापालिकेत चुकीचे काम झाल्यास कारवाई करू

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे, निविदेत रिंग झाल्याचे आरोप मागे झाले होते. माझ्या पाहण्यात काही चुकीचे आल्यास चौकशी लावून कारवाई केली जाईल. महापालिका कामकाजाचा दर आठवड्याला आढावा बैठक घेण्यात येणार आहे. मोठ्या व महत्वाच्या कामावर भाझे लक्ष असणार आहे, असा सूचक इशारा त्यांनी आयुक्तांना दिला.

रेड झोनबाबत अमित शहा यांच्याशी बोलणार

पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात रेड झोनचा प्रश्न 1919 पासून सुटलेला नाही. ती एक मोठी अडचण झाली आहे. त्याबाबत आढावा घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल. राज्यातील साखर कारखान्यांना लावण्यात आलेला 20 ते 25 वर्षांपासूनचा तब्बल 10 हजार कोटीचा आयकर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी रद्द केला. रेड झोन प्रकरणी शहा यांची भेट घेऊन मार्ग काढू, असे सांगत पवार यांनी दिलासा दिला.

दादांनी केले पाकिस्तानचे कौतुक

चांद्रयान तीन मोहिम यशस्वी झाल्याबद्दल जगभरातून भारताचे अभिनंदन होत आहे. भारताबद्दल पाकिस्त कधी चांगला बोलत नाही. मात्र, या मोहिमेचे त्यांनीही कौतुक केले आहे. पाकिस्तानच्या या वृत्तीचे कौतुक करावेसे वाटते, असे सांगत मी पाकिस्तानची बाजू घेत नसल्याचे सांगण्यास ते विसले नाहीत. ही मोहिम देशाचे कुटुंबप्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वाद व पाठींब्यामुळे यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news