अहमदनगर : बाळ बोठेचा जामिनासाठी पुन्हा अर्ज; सहा आरोपींची न्यायालयात हजेरी | पुढारी

अहमदनगर : बाळ बोठेचा जामिनासाठी पुन्हा अर्ज; सहा आरोपींची न्यायालयात हजेरी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या बाळ बोठे याने तब्येतीचे कारण देत जामिनासाठी अर्ज केला आहे. शुक्रवारी (दि. 25) झालेल्या सुनावणीदरम्यान बोठेसह सहा आरोपींची नगरच्या न्यायालयात हजेरी होती. बोठेने केलेल्या अर्जावर येत्या 2 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेखा जरे हत्याकांडात एकूण बारा आरोपी आहेत. यापैकी 11 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले असून, एक महिला आरोपी फरार आहे.

बोठेसह सहा आरोपी नाशिकच्या कारागृहात असताना सुनावणीसाठी नगरच्या न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यासाठी यातील दोन आरोपींनी अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज मान्य केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सहा आरोपींना नगरच्या सबजेलमध्ये हलविले. शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी बाळ जगन्नाथ बोठे, ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर चोळके, फिरोज राजू शेख, ऋषिकेश वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे या सहा आरोपींची उपस्थिती होती व इतर पाच आरोपी गैरहजर होते.

जामिनावर असलेल्या पाच आरोपींनी केलेला गैरहजेरी माफीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. तसेच, बोठेच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या न्यायालयासमोर सुरू आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील बाजू मांडत आहेत. फिर्यादीतर्फे अ‍ॅड. सचिन पटेकर सहायक म्हणून काम पाहत आहेत.

हेही वाचा

Generic drug : जेनेरिक औषधांचीच चिठ्ठी लिहिण्याचे निर्बंध तूर्त स्थगित!

अहमदनगर : चार बांगलादेशींकडून दहशतवादी कृत्यांचा संशय

Dream Girl 2 : आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल २ ची जबरदस्त ओपनिंग

Back to top button