Mission Admission : चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज ! | पुढारी

Mission Admission : चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशांसाठी तीन नियमित आणि तीन विशेष अशा एकूण सहा फेर्‍या पूर्ण झाल्या आहेत. तर चौथी विशेष फेरी सुरू आहे. या फेरीमध्ये 17 ते 23 ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम तसेच अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार 3 हजार 600 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरल्याचे स्पष्ट झाले आहे. आज शनिवारी (दि.26) सकाळी 10 वाजता गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत 326 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेशांसाठी 1 लाख 296 आणि कोटा प्रवेशाच्या 16 हजार 374 अशा 1 लाख 16 हजार 670 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 1 लाख 1 हजार 803 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेर्‍या आणि तीन विशेष फेर्‍यांमध्ये कोटा आणि केंद्रीभूत प्रवेश फेर्‍यांतर्गत एकूण 73 हजार 500 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी अद्यापही 43 हजार 170 जागा रिक्त आहेत. चौथ्या विशेष फेरीत विद्यार्थ्यांना 26 ते 31 ऑगस्टदरम्यान प्रवेश घेता येणार आहे.

राज्य मंडळाने घेतलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत आता चौथ्या विशेष फेरीनंतर पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाईल. या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फेर्‍या राबवल्या जातील, असेदेखील शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

नाशिक : जुन्या सिडकोत दहा ते बारा वाहनांची तोडफोड ; एक ताब्यात, दोघे फरार

पुणे : फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणाच्या फेरतपासणीचा अर्ज फेटाळण्याची मागणी

 

Back to top button