पुणे : वर्षभरात तीन हजार भटक्या मांजरींची नसबंदी | पुढारी

पुणे : वर्षभरात तीन हजार भटक्या मांजरींची नसबंदी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील भटक्या मांजरींची नसबंदी करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षभरात 2966 मांजरींवर नसबंदी प्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, भटक्या मांजर पकडण्यासाठी संबंधित संस्थेला मोठी कसरत करावी लागते, त्यामुळे नसबंदी संख्येवर मर्यादा येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कुत्र्यांची नसबंदी केली जाते. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून विविध संस्थांना नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे व पुन्हा पकडलेल्या ठिकाणीच कुत्र्यांना सोडण्याचे काम दिले जाते.

भटकी मांजरे गाड्यांचे सीट फाडतात, घाण करतात, अशा तक्रारी नागरिकांच्या असतात. भटक्या मांजरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मांजरांच्या संख्येवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर कुत्र्यांच्या धर्तीवर शहरातील भटक्या मांजरींची नसबंदी करून त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाची (एडब्ल्यूबीआय) मान्यता असलेल्या खासगी संस्थेने स्वतःच्या किंवा भाड्याच्या जागेत मांजरींसाठी पायाभूत सुविधा उभारणे, शहरातील भटक्या व मोकाट मांजरींना पकडून त्यांना स्वतःच्या वाहनातून नेऊन त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करणे, त्यांना अँटी रेबिज लस देणे आणि टॅग लावून पकडलेल्या ठिकाणी सोडणे, अशा अटी निविदेमध्ये घालण्यात आल्या आहेत.

यासंदर्भातील निविदा आरोग्य विभागाने 2020 मध्ये प्रसिद्ध केली होती. मात्र, एडब्ल्यूबीआयने निश्चित केलेली रक्कम आणि नसबंदीच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष येणारा खर्च यामध्ये तफावत असल्याने एकाही संस्थेने रस दाखविला नाही. त्यानंतर महापालिकेने फेरनिविदा काढून एका संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेने सप्टेंबर 2022 पासून 24 ऑगस्ट 2023 पर्यंत शहरातील 2966 भटक्या मांजरींची नसबंदी केल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे-भोसले यांनी दिली.

शहरातील भटक्या कुर्त्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते. तशाच प्रकारे शहरातील भटक्या मांजरींवरही नसबंदीची शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. कुत्र्यांना पकडणे सोपे काम आहे. मात्र, भटक्या मांजरींना पकडणे
अवघड काम आहे. त्यामुळे मांजरींवर नसबंदी शस्त्रक्रिया करणार्‍या संस्थेला मांजर पकडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

सप्टेंबर ते 24 ऑगस्ट पर्यंतची नसबंदी आकडेवारी
सप्टेंबर : 45
ऑक्टोबर : 240
नोव्हेंबर : 265
डिसेंबर : 291
जानेवारी : 339
फेब—ुवारी : 276
मार्च : 351
एप्रिल : 287
मे : 334
जून : 194
जुलै : 210
24 ऑगस्टपर्यंत : 134
एकूण : 2966

Back to top button