

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी तीन वॉटर कॅनन वाहने, फायर टेंडरची 6 वाहने आणि अडव्हान्स रेस्क्यू टेंडरची 2 वाहने अशी एकूण 11 अद्ययावत वाहने खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 40 कोटी 2 लाख खर्च येणार आहे. यासह विविध कामांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या आसपास पोहोचली आहे. शहरातील सर्व भागात वेळेत अग्निशमन वाहने पोचावीत म्हणून महापालिका अद्ययावत वाहने खरेदी करीत आहेत. तीन वॉटर कॅनन वाहनांचा खर्च 13 कोटी 70 लाख 51 हजार 83 रुपये आहे. ही वाहने चिखली येथील हायटेक सर्व्हिसेस यांच्याकडून निविदा दरापेक्षा 0.65 कमी दराने खरेदी करण्यात येणार आहेत.
सहा फायर टेंडर वाहनांसाठी 17 कोटी 52 लाख 35 हजार 767 इतका खर्च आहे. ही वाहनेही ही त्याच ठेकेदाराकडून निविदा दरापेक्षा 0.70 टक्के कमी दराने खरेदी करण्यात येत आहेत. अडव्हान्स रेस्क्यू टेंडरची 2 वाहनांसाठी 8 कोटी 97 लाख 79 हजार 855 इतका खर्च आहे. ही दोन वाहने त्याच ठेकेदारांकडून घेण्यात येणार आहेत. त्याचा दर 0.85 टक्के इतका कमी आहे.
तसेच, सेक्टर क्रमांक 16, राजे शिवाजीनगर अग्निशमन केंद्रात फर्निचर व इतर स्थापत्य विषयक कामाच्या खर्चास मान्यता देण्यात आली. उद्यान विभागामार्फत कॅलिग्राफी उद्यानांमध्ये भिंती रंगवण्याबाबत, व्हर्टिकल गार्डनसाठी प्लास्टिक पॉट स्टँडसह साहित्य पुरविणेबाबत, नर्सरीसाठी प्लास्टिक पॉट खरेदी करणेबाबत येणार्या खर्चास मान्यता देण्यात आली.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चर्होली येथील 1 हजार 442 सदनिकांच्या प्रकल्पातील किचनच्या खिडक्यांना एमएस ग्रील बसविण्यासाठी येणार्या खर्चास मान्यता देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक कामे करणे, नवजात अर्भक विभागाचे नूतनीकरण करणे, डॉक्टरांचे निवासस्थान नूतनीकरण व विद्युतविषयक कामाच्या खर्चास मान्यता देण्यात आली. पंतप्रधान योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चर्होली व मोहननगर येथे निवासी गाळे बांधणेसाठी खर्चास मान्यता देण्यात आली.
हेही वाचा