

पिंपरी(पुणे) : ज्याची कुणकुण होती तेच घडलं, दादांनी पालिकेत लक्ष घातलं; आता पुढं काय होणार, अशी चर्चा गुरुवारी शहरातील राजकीय वर्तुळात सुरू झाली. सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून शहरात प्रथमच येत असलेल्या अजित पवारांनी पालिकेत बैठक लावली आणि कुजबूज सुरू झाली. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका गतवेळी भाजपच्या ताब्यात आली. सत्ता असताना शहराच्या राजकारणात आणि विकासात अजित पवारांनी जातीने लक्ष घातले.
येथील स्थानिक राजकारणावर त्यांची कमांड होती आणि आहे. म्हणूनच निर्विवाद वर्चस्व असणारे हे शहर गतवेळी ताब्यातून गेल्याने हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता, म्हणूनच शिवसेनेबरोबर महाविकास आघाडी केल्यानंतर पवारांनी पुन्हा शहरातील राजकारणामध्ये लक्ष घातले होते. महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्यांनी तोफ डागली. चिंचवड लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देऊन त्यांनी या निवडणुकीतही रंग भरला आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरायला भाग पाडले होते. त्या वेळची त्यांची राजकीय वक्तव्येही गाजली होती.
दरम्यान, भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्यानंतर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असताना अजित पवार पुन्हा शहरात लक्ष घालणार का, याबाबत चर्चा सुरू होती. काहीही झाले तरी ते लक्ष घालणारच, असा विश्वास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून खासगीत व्यक्त केला जात होता. मात्र, मित्रपक्षाचे संकेत लक्षात घेता तसे होणार नाही, असा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा अंदाज होता. मात्र, पवारांनी पहिल्याच दौर्यात महापालिकेत बैठक नियोजित करून हा अंदाज फोल ठरविला आहे.
शहरातील प्रश्नांबाबतचे गार्हाणे मांडण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते व महिलांनी अजित पवारांची भेट घेतली होती. या वेळी पवारांनी थेट आयुक्तांना फोन करून सूचना केल्या होत्या. एकतर्फी निर्णय घेऊ नका, माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही, असे समजू नका, मी लवकरच बैठक घेणार आहे, अशा शब्दात त्यांनी आयुक्तांना सुनावल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला होता. बैठक घेऊन पवारांनी दोनच दिवसांपूर्वी दिलेला शब्द खरा केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराशी अजित पवारांचे असलेले नाते सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्याच दौर्यात बैठक लावल्याचे विशेष नसले तरी भाजप अथवा शिवसेना शिंदे गटाच्या इतर वरिष्ठ नेते अथवा मंत्र्यांनी अशा प्रकारे महापालिकेच्या कामात लक्ष घातलेले नाही. पवारांनी पुनश्च सुरुवात करून यापुढे स्थानिक पातळीवरील राजकारणाची दिशा कशी असेल, याबाबत सूचक पावले टाकली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी (दि.25) पिंपरी-चिंचवड शहराचा दौर्यावर आहेत. ते आयुक्तांसोबत आढावा बैठक घेऊन महापालिकेच्या विविध कामांचा आढावा घेणार आहेत. तसेच, चिंचवड येथे पक्षाचा मेळावाही आयोजित केला असून, ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. पवार यांंचे सकाळी 9.45 वाजता रावेत येथे आगमन होणार आहे.
रावेत, वाल्हेकरवाडी, चापेकर चौक, चिंचवड स्टेशन, मोरवाडी आदी ठिकाणी पक्षाच्या वतीने स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासोबत आढावा बैठक घेणार आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा दुपारी दोन वाजता होणार आहे. या मेळाव्यास पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
यानिमित्त शहराभरात उपमुख्यमंत्री पवार यांच्या स्वागताचे मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. ते कार्यकर्ता मेळाव्यात काय मार्गदर्शन करणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महापालिकेच्या सुरू असलेल्या विविध प्रकल्प, विकासकामांची माहिती घेणार आहेत. महापालिकेची चिंचवड येथील नवीन इमारतीचे सुरू असलेले काम, मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जीतून वीजनिर्मितीची सुरुवात, पंतप्रधान आवास योजनेत गृहप्रकल्पांची निर्मिती, पंतप्रधान आवास योजनेतील मोहननगर व उद्यमनगर येथील गृहप्रकल्पांसाठी मागविण्यात आलेले अर्ज, स्मार्ट सिटीची रखडलेली विविध कामे, पाणीपुरवठा विभागाची विविध कामे, भामा आसखेड धरण येथे सुरू असलेले जॅकवेल व पंपिंग स्टेशनचे काम, पवना बंद जलवाहिनीचे रखडलेले काम, दिवसाआड पाणीपुरवठा,
18 मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांचे यांत्रिक पद्धतीने साफसफाईचे कामाची सुरुवात, महापालिकेचा नवीन सुधारित आकृतीबंध, मोरवाडी येथील दिव्यांग भवन, पवना, इंद्रायणी व मुळा नदी सुधार योजना, 200 कोटीचे म्युन्सिपल बॉण्ड, मोशी कचरा डेपोतील बायोमॉनिंग, वाढते नदी प्रदूषण, शहरात वृक्षांची बेसुमार कत्तल, स्वच्छ सर्वेक्षण, प्रत्येक घरटी घेण्यात येणारा उपयोगकर्ता शुल्क वसुली, मोशी क्रिकेट स्टेडियम व बहुउद्देशीय क्रीडा संकुल, निसर्गकवी बहिणाबाई प्राणिसंग्रहालयाचे रखडलेले काम, शहरात वाढते अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे, अनधिकृत जाहिरात होर्डिंग यासह विविध विषयांवर ते आयुक्तांकडून माहिती घेणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
हेही वाचा