पुणे पालिकेच्या वाहन विभागातील लाचखोर कर्मचार्‍याला पकडले | पुढारी

पुणे पालिकेच्या वाहन विभागातील लाचखोर कर्मचार्‍याला पकडले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कंत्राटी वाहनचालक म्हणून काम करणार्‍या एका व्यक्तीकडून महापालिकेतील गाडीवर दररोज काम नेमून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणार्‍या महापालिकेच्या वाहन विभागातील कर्मचार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. पांडुरंग साधू लोणकर (वय 57) असे लाचखोर कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याच्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 32 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. महापालिकेचा गुलटेकडी भागात वाहन डेपो आहे. या डेपोत लोणकर याच्याकडे वाहन वाटपाची (स्टार्टर) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिकेतील विविध कामांसाठी ठेकेदारांकडून कंत्राटी पद्धतीवर टेम्पो, डंपर, टँकर अशी वाहने घेण्यात येतात. कंत्राटी पद्धतीवर गाडी लावण्यासाठी लोणकर याने तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर शंकरशेठ रस्त्यावर सापळा लावून तक्रारदाराकडून चार हजारांची लाच घेणार्‍या लोणकरला पकडण्यात आले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या  मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव आणि पथकाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक वीरनाथ माने तपास करत आहेत.

हेही वाचा : 

Seema Deo : देखणी अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड

Nepal Accident update | नेपाळमधील अपघातात ६ भारतीय भाविकांसह ७ जणांचा मृत्यू

Back to top button