Pune Metro : मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरच | पुढारी

Pune Metro : मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरच

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महामेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यातील विस्तारित व नवीन मेट्रो मार्गाच्या प्रस्तावास महापालिकेच्या स्थायी समितीनंतर मुख्य सभेनेही मान्यता दिली आहे. यासंबंधीचा ठराव महापालिकेने महामेट्रोला सुपूर्द केला असून, तो लवकरच राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला आणि पौड फाटा-वारजे-माणिकबाग या विस्तारित मेट्रो मार्ग आणि नवीन मार्गांचा सविस्तर प्रकल्प आराखडा महामेट्रोने जानेवारीमध्ये महापालिकेला सादर केला. यात काही सुधारणा सुचविल्यानंतर हा आराखडा स्थायी समितीने 4 ऑगस्ट रोजी मंजूर केला. त्यानंतर 14 ऑगस्टला यास मुख्य सभेची मंंजुरी देण्यात आली.

महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महापालिका व महामेट्रोच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात महापालिकेने हे ठराव महामेट्रोकडे सुपूर्द केला असून, तो अंतिम मंजुरीसाठी लवकरच राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. दरम्यान, मेट्रो प्रकल्पातील पालिकेच्या हिश्श्यापोटी महापालिकेने महामेट्रोला 150 कोटी रुपये देणे आहे. मात्र, मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी महापालिकेने जी-20 बैठकांच्या काळात केलेले सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, सांडपाणी व्यवस्था, पदपथ दुरुस्ती यासाठी आलेल्या खर्चाची रक्कम त्यातून वजा करून उर्वरित रक्कम महामेट्रोला दिली जाईल, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी सांगितले.

विस्तारित मार्गिका
वनाज ते चांदणी चौक (1.122 किमी)
रामवाडी ते वाघोली (11.633 किमी)
खराडी-हडपसर-स्वारगेट-
खडकवासला (25.862 किमी )
पौड फाटा-वारजे-माणिकबाग (6.118 किमी)

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील सविस्तर प्रकल्प अहवालात दर्शविण्यात आलेल्या मार्गिकांमध्ये नंतर काही बदल केले गेले. त्यामुळे आता या मार्गिकांवर स्थानकांलगत वाहनतळाची जागा निश्चित केली जाणार आहे. यासाठी महापालिका व महामेट्रोच्या प्रत्येकी दोन अधिकार्‍यांची समिती नेमण्यात येईल. ही समिती प्रत्यक्ष जागांची पाहणी करून वाहनतळासाठीची जागा निश्चित करेल. जागा निश्चित झाल्यानंतर महामेट्रोतर्फे वाहनतळ विकसित केले जाईल. त्यातून मिळणारे उत्पन्न महापालिका व महामेट्रो वाटून घेतील.
                                  – श्रीनिवास बोनाला, प्रकल्प विभागप्रमुख, महापालिका

Back to top button