राज्यात ‘पेसा’तील 80 टक्के शिक्षक भरती होणार; 13 जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी | पुढारी

राज्यात ‘पेसा’तील 80 टक्के शिक्षक भरती होणार; 13 जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 13 जिल्ह्यांतील शिक्षक भरतीबाबत संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील पदभरती करण्यास सांगितले आहे. त्यानुसार पेसा क्षेत्रातील 80 टक्के रिक्त पदे भरण्याबाबत कळविण्यात आले आहे. अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे व यवतमाळ या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मांढरे यांनी दिली.

त्यांनी झेडपीच्या सीईओंना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत शासन पत्र दि. 3 एप्रिल 2023 अन्वये वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या 80 टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनुसूचित जमाती -पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने त्यांच्या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे.

पवित्र प्रणालीमार्फत अनुसूचित जमाती-पेसामधील रिक्त पदे भरण्यासाठी अन्य पदभरतीबरोबर काही कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत असल्याने या कार्यालयाकडून पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत अन्य पर्यायांचा विचार करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यात आले होते. पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्याचे प्रमुख यानी कार्यवाही करण्याची तरतूद आहे.

ही तरतूद लक्षात घेता अभियोग्यता 2022 चाचणी दिलेल्या उमेदवारांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. संबंधित परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवाराचा आपल्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करावी. या प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य सर्वसाधारण भरती प्रक्रियेमधील गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर निवडीचा पर्याय यापुढे खुला ठेवण्यात आल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

कांदाप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली आज बैठक

पिंपरी : फेर, फुगडीने नागपंचमीचा आनंद द्विगुणित

जगातील सर्वात महागडे नाणे!

Back to top button