सहकारमंत्री वळसे पाटलांचे शिलेदार ‘गोविंदबागे’त; शरद पवारांची घेतली भेट 

सहकारमंत्री वळसे पाटलांचे  शिलेदार ‘गोविंदबागे’त; शरद पवारांची घेतली भेट 
Published on
Updated on
शिक्रापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघात किल्ला लढविणारे शिरूरच्या 39 गावांतील टाकळी हाजी-रांजणगाव व पाबळ जिल्हा परिषद गटातील शिलेदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची गोविंदबाग या बारामतीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शरद पवार यांच्याशी प्रामाणिक असल्याची ग्वाही देत या नेत्यांनी शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी तसेच चासकमान, डिंभे धरणातून मिळणारे पाणी, यामुळे शिरूर तालुका शरद पवार यांच्यामुळे संपन्न झाला असल्याची कबुली खुद्द पवार यांच्यासमोर देत या नेत्यांनी विकासकामांचे श्रेय पवार यांना दिले.
टाकळी हाजीचे माजी सरपंच व या जिल्हा परिषद गटावर पकड असणारे दामू गोडे, रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर, पाबळ जिल्हा परिषद गटातील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर या प्रमुख नेत्यांचा शरद पवार यांची भेट घेणार्‍यांत समावेश होता. शिरूर तालुक्यातील 39 गावांतील हे नेते वळसे पाटील यांची साथ सोडून शरद पवार यांच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या भागात मोठी फूट पडल्याचे दिसून येईल.
राष्ट्रवादीतील अनेक नेते सत्तेबरोबर जाताना अजित पवार गटात समाविष्ट होत असताना अनेकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची शिरूर-आंबेगाव विधानसभेवर असणारी पकड लक्षात घेता व त्यांचा सत्तेत असलेला सहभाग पाहता त्यांची कोणी साथ सोडणार नाही, असे वाटत असताना आंबेगाव बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांच्यासमवेत शिरूर तालुक्यातील या नेत्यांनी भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण होणार आहेत.
याबाबत बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर म्हणाले की, संपूर्ण देशामध्ये शिरूर तालुका हा औद्योगिक व कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे. याचे श्रेय शरद पवार यांना आहे. आशिया खंडातील पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसी तसेच शिरूर तालुक्याला मिळणारे चासकमान व डिंभे धरणाचे पाणी ही शरद पवारांची देणगी आहे, यामुळे येथील प्रत्येक घासावर शरद पवारांची आठवण येते. बाजार समितीचे सभापती जांभळकर यांनी सांगितले की, आम्ही शरद पवार यांच्या सोबत असून, त्यांनी तालुक्यात केलेल्या विकासकामांचे श्रेय कोणी अव्हेरून चालणार नाही.
टाकळी हाजीचे माजी सरपंच दामू घोडे, चंद्रशेखर पांचुदकर व शंकर जांभळकर हे अनुक्रमे टाकळी हाजी रांजणगाव गणपती व पाबळ जिल्हा परिषद गटाचे प्रमुख दावेदार मानले जातात. अजित पवार गट तसेच सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या गटाचे सामर्थ्य टिकविण्यासाठी टाकळी हाजी गटातून माजी आमदार पोपटराव गावडे, रांजणगाव जि. प. गटातून राष्ट्रवादीचे आंबेगाव शिरूर तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, तर पाबळ जि. प. गटातून बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आली असून, वळसे पाटील यांच्यासमवेत ते खंबीरपणे उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने निश्चितच या पक्षाची ताकद विभागली गेली आहे.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news