तलाठी परीक्षेत गोंधळ | पुढारी

तलाठी परीक्षेत गोंधळ

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : तलाठी भरती परीक्षेच्या दरम्यान टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी पहिल्या सत्रात सकाळी 9 वाजता परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे पुणे, नागपूर, अमरावती, नाशिकसह राज्यात अनेक केंद्रांवर गोंधळ उडाला. यांत्रिक बिघाड दुरुस्त करून दोन तासानंतर ही परीक्षा घेण्यात आली. राज्यातील लाखो परीक्षार्थींना याचा फटका बसला. दरम्यान, परीक्षार्थींना झालेल्या त्रासाबद्दल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची तातडीची बैठक बोलावली आहे.

यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परीक्षा उशिरा सुरू होण्याबाबत कळविण्यात आले. राज्यातील सर्वच शहरांतील परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊनमुळे गोंधळ उडाला. टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परीक्षा 11 वाजता राज्यातील 30 जिल्हे व 115 टीसीएस केंद्रांवर सुरू करण्यात आली. या दरम्यान सर्वच केंद्रांवर सकाळच्या सत्रातील परीक्षा रखडली.

याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले की, तलाठी भरती परीक्षेपासून कोणताही परीक्षार्थी वंचित राहणार नाही. मात्र परीक्षार्थींना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच, यापुढील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच सुरळीत पार पडतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्य समन्वयक यांनी सर्व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून प्रथम सत्रातील विद्यार्थ्याना आणि त्याप्रमाणे सर्व परीक्षा केंद्रांवरील परीक्षार्थीना सर्व्हरमधील बिघाडाची सूचना दिली. राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी होणार्‍या उर्वरित दोन्ही सत्रांतील परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरू झाल्या. पुढील सर्व परीक्षा वेळापत्रकानुसार सुरळीत पाडण्यासाठी विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावे, असेही विखे-पाटील म्हणाले.

तलाठी भरतीसाठी यंदा दहा लाख 40 हजार 713 अर्ज छाननीअंती प्राप्त झाले आहेत. तांत्रिक बिघाड निदर्शनाला आल्यानंतर तातडीने प्रत्येक जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्रथम सत्रातील परीक्षा विलंबाने सुरू होणार असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार सर्व परीक्षा केंद्रांवरील उमेदवारांना स्थानिक प्रशासनाकडून सूचना देण्यात आली होती, अशी माहिती तलाठी भरती परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी पुणे येथे माध्यमांना दिली. दिव्यांग उमेदवारांना सोमवारी दुसर्‍या सत्रात अतिरिक्त असणारा वेळही देण्यात आला.

छत्रपती संभाजीनगरातही गोंधळ

छत्रपती संभाजीनगरातही तलाठी परीक्षेवेळी अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी बंद पडली. विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ होऊनही परीक्षा केंद्राबाहेरच ताटकळावे लागले. अखेर सकाळी 10 वाजता सर्व्हर सुरू झाला. त्यानंतर उमेदवारांची नोंदणी होऊन प्रत्यक्ष परीक्षा सुरू व्हायला सकाळी 11 वाजले. पहिल्या सत्रातील परीक्षा दोन तास उशिराने सुरू झाली. पहिल्या सत्राला विलंब झाल्यामुळे उर्वरित दोन सत्रातील पेपरही उशिराने पार पडले. तिसर्‍या सत्रातील परीक्षा सायंकाळी 7.30 वाजता संपली. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला.

सोलापूर, नागपूरमध्ये परीक्षार्थी केंद्रांवरच ताटकळले

टीसीएस कंपनीचा सर्व्हर अचानकपणे डाऊन झाल्यामुळे सोलापूर आणि नागपूर केंद्रांवरही विद्यार्थी ताटकळत बसले होते. यातील बहुतांश विद्यार्थी बाहेरील जिल्ह्यांतून आलेले होते. अनेक तरुण नोकरी नसल्याने चिंतेत असताना परीक्षेतही गोंधळ होत असल्याने तरुणांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

कोल्हापूर जिल्ह्यातही परीक्षा दोन तास उशिरानेच

कोल्हापूर : सर्व्हर डाऊनचा फटका राज्यभरातील तलाठी भरती परीक्षेला बसला. कोल्हापूर जिल्ह्यातील 9 केंद्रांवरही याचा परिणाम दिसून आला. दोन तास उशिरा पेपर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. परंतु दरम्यानच्या काळात परीक्षार्थींचा गोंधळ उडाल्याचे दिसून आले.

राज्य पातळीवरच तलाठी भरतीला उदंड प्रतिसाद मिळाला. जागा कमी आणि परीक्षार्थींची विक्रमी संख्या यामुळे या परीक्षा मोठ्या चर्चेत आल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील 56 जागांसाठी तब्बल 49 हजार उमेदवार या परीक्षेसाठी बसले आहेत. गुरुवार, 17 ऑगस्टपासून या
परीक्षा सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जे. जे. मगदूम महाविद्यालय (जयसिंगपूर), डीकेटीई (इचलकरंजी), तात्यासाहेब कोरे महाविद्यालय ( वारणानगर), संजीवन महाविद्यालय (पन्हाळा), विकासवाडी (शिये), न्यू पॉलिटेक्निक उचगाव या केंद्रावर या परिक्षा दररोज तीन सत्रांत सुरू होत आहे. पहिल्या सत्रासाठी सोमवारी (दि. 21) परीक्षार्थी केंद्रावर मोठ्या संख्येने जमा होत होते. परंतु सर्व्हर सुरू होत नसल्याने विद्यार्थी आणि प्रशासनाचाही गोंधळ उडाला.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एक निवेदन प्रसिद्धीस देऊन या परीक्षेतील गोंधळाबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच या परीक्षा दोन तास उशिरा होतील, असे संबंधित परीक्षा केंद्रावर कळविले. त्यामुळे हा गोंधळ दूर करण्यास मदत झाली. परीक्षा घेणार्‍या टीडीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हिसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा गोंधळ राज्यभर उडाला होता. प्रशासनाने तसेच संबंधित कंपनीने वरिष्ठ वैज्ञानिक स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न केले. तांत्रिक दोष शोधून दूर केला. त्यामुळे दोन तास उशिरा पहिल्या सत्राचा पेपर सुरू झाला. त्यानंतर पुढील दोन्ही सत्रे दोन तास उशिरा सुरू करत हा गोंधळ दूर केला. त्यानंतर सर्व परीक्षा केंद्रांवर याची माहिती देऊन परीक्षार्थीना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आला. त्यानंतर परीक्षेला सुरुवात झाली. टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटरच्या बिघाडामुळे निर्माण झालेल्या संभ—मावस्थेबद्दल व गोंधळाबद्दल प्रशासनाने तत्काळ निवेदनाद्वारे दिलगिरी व्यक्त केली.

Back to top button