सायन्स सिटीसाठी चिंचवडऐवजी पुण्यातील जागेचा शोध | पुढारी

सायन्स सिटीसाठी चिंचवडऐवजी पुण्यातील जागेचा शोध

पिंपरी(पुणे) : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कशेजारील जागेत जागतिक दर्जाचे भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी (सायन्स सिटी) उभारण्यात येणार होते. मात्र, त्याऐवजी पुणे शहरातील जागा शोधण्यात येत आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये प्रकल्प उभारणीचा निर्णय रद्द झाल्याची चर्चा सुरू आहे.

25 एकर जागेची कमी

सायन्स सिटीचे डिजाईन व ऑर्किटेक्टसाठी रिक्वेस्ट फॉर प्रप्रोजलसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात ऑस्ट्रेलिया, युएसए, कॅनडा तसेच, पंतप्रधान संग्रहालय उभारलेली कंपनी, लष्करी संस्था अशा नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. मात्र, त्यानंतर कार्यवाही संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, चिंचवड येथे 5.75 एकर जागा शिल्लक आहे. तेथे सायन्स सिटी उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र, राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 25 एकर जागेत भव्य असे सायन्स सिटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

इतकी मोठी जागा महापालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी पुणे शहरातील मुंढवा येथील जागेस पसंती देण्यात आली आहे. तेथील 25 एकर जागा ही शहरातील गोठे स्थलांतरित करण्यासाठी आरक्षित आहे. त्या आरक्षणात बदल करून सायन्स सिटी उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यावरून चिंचवडचा प्रकल्प पुणे शहराकडे पळविण्याचा हालचाली सुरू आहेत. त्यासंदर्भात महापालिकेने तातडीने उपाययोजना न केल्यास हा प्रकल्प शहरातून बाहेर जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

वाहतुकीच्या सुविधा शहरात उपलब्ध

पालिकेच्या चिंचवड येथील सायन्स पार्कला राज्यभरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी वर्षभर भेट देतात. तिकीटाच्या उत्पन्नातील 60 लाखांच्या बँक ठेवीवर सायन्स पार्कचे कामकाज सुरू आहे. सायन्स पार्कला ये-जा करण्यासाठी मेट्रो, बीआरटी बस, रेल्वे, पुणे-मुंबई जुन्या महामार्ग, बीआरटी बस, रेल्वे व मेट्रो सेवा उपलब्ध आहे. शहराजवळ विमानतळ आहे. दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध आहेत. शहरापासून मुंबईशी कनेक्टीव्हिटी सुलभ आहे. शहरात अनेक नामवंत शैक्षणिक संस्था आहेत. वाहतुकीच्या अनेक सुविधा उपलब्ध असल्याने राज्यातून तसेच, देशातून विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी नागरिकांना सायन्स सिटीला भेट देणे सुलभ होणार आहे. त्यामुळे शहरात सायन्स सिटी होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा लावलौकीक वाढणार आहे.

191 कोटींचा निधी मंजूर

चिंचवडमध्ये सायन्स सिटी उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 1 सप्टेंबर 2021 ला घेतला आहे. केंद्र पुरस्कृत असलेल्या या सिटीसाठी 191 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. विद्यार्थ्यार्मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी 7.5 एकर जागेत विज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यापैकी 1.75 एकर जागेवर महापालिकेने 8 फेब—ुवारी 2013 ला सायन्स पार्क उभारले आहे. उर्वरित 5.75 एकर जागेत सायन्स सिटी उभारण्यात येणार आहे. ती सिटी पाच वर्षांत उभारण्यात येणार होती.

हेही वाचा

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांच्या आईचे मंगळसूत्र हिसकावले

दगड तळून तयार केली जाते सुओडिओ डिश!

पिंपरी : वर्गणीसाठी जबरदस्ती; तरुणांवर गुन्हा

Back to top button