वैतागलेले शिक्षक आंदोलनाच्या तयारीत

वैतागलेले शिक्षक आंदोलनाच्या तयारीत

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  प्राथमिक शाळांमधील अशैक्षणिक कामे व जिल्हा परिषदेची दप्तरदिरंगाई यामुळे वैतागलेल्या शिक्षकांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि. 21) शिक्षक संघाच्या बैठकीत आंदोलनाचे स्वरूप ठरविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. प्राथमिक शाळांमधील ऑनलाइन कामांमुळे अध्यापनास वेळ मिळत नसल्याची शिक्षकांची तक्रार आहे. शासनाकडून रोज वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागवली जात आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये मागील दहा वर्षांपासून मुख्याध्यापक पदोन्नती करण्यात आलेली नाही. न्यायालय व मंत्रालयाच्या स्थगितीच्या नावाखाली जिल्हा परिषदेने पदोन्नती लांबवली आहे.

समाजशास्त्र व विज्ञान पदवीधरांचा प्रश्नदेखील खूप दिवसांपासून रखडला आहे. सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या अवघड क्षेत्रामध्ये बदल्या झाल्याने न्यायालयामध्ये चकरा मारण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. जिल्हाभरातील प्राथमिक शाळांमधील रिक्त जागा वर्षानुवर्षे भरल्या गेलेल्या नाहीत. यामुळे त्रस्त झालेल्या शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षक संघाच्या जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी व तालुका संघाचे अध्यक्ष यांची बैठक सोमवारी पुणे येथे होणार आहे. या बैठकीत आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news