घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाइन मतदार नोंदणी | पुढारी

घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाइन मतदार नोंदणी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी व्हावी म्हणून शनिवार (दि.19) आणि रविवार (दि.20) पत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. या पत्रकावर अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी स्कॅनर देण्यात आला आहे.

नवमतदारांनी कोड स्कॅन करून माहिती भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी नीलेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि.18) केले आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात नवमतदार नोंदणी, स्थलांतर मतदारासह मतदार यादी शुध्दीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी चिंचवड मतदार नोंदणी कार्यालयामार्फत हाऊसिंग सोसायट्यांमध्ये शिबिर आणि विविध महाविद्यालयात स्पर्धा घेण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना मतदार नोंदणी अधिकारी नीलेश देशमुख म्हणाले की, चिंचवड मतदारसंघ हा राज्यातील सर्वाधिक मतदार असलेला दुसर्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. आणखी काही मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत. त्यांच्या नावाचा समावेश व्हावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वेळोवेळी जनजगृतीसह विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

नवमतदारांना मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी त्यांच्या जनजागृती होण्यासाठी तिन्ही मतदारसंघात पत्रके वाटण्यात येणार आहेत. तसेच या पत्रकावर व्होटर अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी स्कॅनर देण्यात आला आहे. नवमतदारांना कार्यालयात जाण्याची गरज नाही. कोड स्कॅन करून माहिती भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे. तसेच, चिंचवड मतदारसंघात घरोघरी बीएलओ जाऊन मतदार यादी शुध्दीकरण करण्यात येत आहे.

हे अर्ज भरा

नवमतदारांना नावनोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक 6, परदेशी मतदारांची नोंदणीसाठी अर्ज क्रमांक 6 अ, निवडणूक प्रमाणीकरण फॉर्म 6 ब, इतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्याबाबत आक्षेप घेण्यासाठी, स्वतःचे नाव वगळण्यासाठी, इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी अर्ज क्रमांक 7, मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्त्यांसाठी अर्ज क्रमांक 8 भरून द्यावा, असे आवाहनही मतदार नोंदणी अधिकारी नीलेश देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा

राज्यात जमिनींची मोजणी होणार गतिमान

नाशिकमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात

विधानसभेच्या 51, तर लोकसभेच्या 11 जागा हव्या : जोगेंद्र कवाडे

Back to top button