पावसाअभावी शेतकरी चिंतातुर; हवेली तालुक्यातील चित्र | पुढारी

पावसाअभावी शेतकरी चिंतातुर; हवेली तालुक्यातील चित्र

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ऑगस्ट महिना अर्धा संपला, तरी पुरेसा पाऊस नसल्याने सिंहगड भागासह हवेली तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील 35 टक्क्यांहून अधिक खरीप क्षेत्रांतील भात पिकांच्या लागवडी तसेच पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या चार, पाच दिवसांत पाऊस न झाल्यास लागवड केलेली पिकेही वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

हवेली तालुक्याच्या पश्चिम भागातील डोणजे, खानापूर, खडकवासला, नांदोशीसह परिसरात पावसाने ओढ दिली आहे. तुरळक पावसाचा अपवाद वगळता गेल्या दोन आठवड्यांपासून ऊन पडत आहे. हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे म्हणाले की, तालुक्यात खरीप पिकांच्या लागवडीखाली पाच हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 3 हजार 700 हेक्टर क्षेत्रात लागवडी झाल्या आहेत. 1 हजार 300 हेक्टर क्षेत्र पावसाअभावी पडून आहे.

तालुक्यात बाजरीचे 900 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 500 हेक्टरमध्ये पेरण्या केल्या आहेत. खरीप ज्वारी, सोयाबीन भुईमूग व इतर पिकांचे
क्षेत्र जवळपास 2 हजार हेक्टर क्षेत्र आहे. पावसाअभावी गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच हवेली तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांच्या लागवडी करूनही पाऊस नसल्याने भात, भुईमूग अशी पिके वाया चालली आहेत. शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अपुर्‍या पावसामुळे शेतीत कोणते पीक घ्यायचे यासाठी गावोगाव शेतकर्‍यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी खानापूरचे
माजी सरपंच शरद जावळकर यांनी केली आहे.

हवेली तालुक्याच्या पश्चिम भागात प्रामुख्याने भात शेतीवर शेतकर्‍यांची उपजीविका आहे. सर्वांत अधिक 2 हजार 210 हेक्टर क्षेत्र भात पिकांखाली आहे. आतापर्यंत 1 हजार 710 हेक्टर क्षेत्रात भात रोपांच्या लागवडी पूर्ण झाल्या आहेत. 500 हेक्टर भात शेती पावसाअभावी पडून आहे.

– मारुती साळे, कृषी अधिकारी, हवेली तालुका.

हेही वाचा

1 कोटी 17 लाखांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : चव्हाणनगरला न सोडल्यास मारून टाकण्याची धमकी

राज्यात जमिनींची मोजणी होणार गतिमान

Back to top button