राष्ट्रवादीतील मतभेद वैयक्तिक नव्हे तर वैचारिक : खा. सुप्रिया सुळे | पुढारी

राष्ट्रवादीतील मतभेद वैयक्तिक नव्हे तर वैचारिक : खा. सुप्रिया सुळे

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षामध्ये काही विचारांमध्ये अंतर आलेले आहे. याचा व पवार कुटुंबाचा काही संबंध नाही. पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. बारामती दौऱ्यावर आलेल्या सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादीमध्ये गेल्या २४ वर्षांपासून शरद पवार यांचे नेतृत्व मान्य कले आहे. असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी कष्टाने पक्ष वाढवला. पक्षावर प्रेम केले. पक्षातील फूट हा कौटुंबिक विषय नाही.

हे राजकारण नव्हे तर समाजकारण आहे. आम्ही सगळेच मायबाप जनतेची सेवा कऱण्यासाठी राजकारणात आलो आहेत. त्यामुळे पक्षातील पडलेल्या अंतराचा पवार कुटुंबाशी काही संबध नाही. आमच्यातील काही लोकांना वेगळ्या विचारासोबत जावे असे वाटले. काहींचे मत वेगळे आहे, पण वैयक्तिक मतभेद नाहीत. वैचारिक मतभेद आहेत. आमच्या आत्या सरोज पाटील यांचे पती एन. डी. पाटील व शरद पवार या दोघांनी वेगळ्या वैचारिक चौकटीतून राजकारण केले. परंतु नाते मात्र त्यांनी जपले.

तेवढी प्रगल्भता पवार कुटुंबामध्ये आहे. राष्ट्रवादी हा वैचारिक भूमिकेचा पक्ष आहे. त्यामध्ये काही अंतर दिसते आहे. पण ते वैचारिक आहेत मनभेद नाहीत. बारामतीत अजित पवारांसोबत असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते तुमच्या दौऱ्यात सहभागी झाले आहेत, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, हे कार्यकर्ते नव्हे तर पवार कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत. त्याचा चुकीचा अर्थ काढू नका.

अजित पवार यांनी साथ सोडल्याने एकाकी पडल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, लोक माझ्यासोबत आहेत अन राहतील. माझे इथले राजकारण हे समाजकारण आहे. मी राष्ट्रवादीकडे फक्त लोकसभेचेच तिकिट आजवर मागितले आहे. सेवा, शेतकऱ्यांचा सन्मान व महाराष्ट्राचा स्वाभिमान या तीन कारणांसाठी मी राजकारणात आले आहे. सेवक म्हणून मला जनतेने १५ वर्षे संधी दिली. मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहिल. या भागासह राज्यातील कामांचा पाठपुरावा दिल्लीत करणे हे माझे काम आहे. तुम्ही माझी संसदेतील कामगिरी बघत असता. तेथे बारामती लोकसभा मतदार संघाची आण, बाण आणि शाण पहिल्या क्रमांकावर राहिल, यासाठी माझा प्रयत्न असेल.
शरद पवार सोबत आले तरच अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या विजय वड्डेटीवार यांच्या वक्तव्यासंबंधी मला माहिती नसल्याच्या त्या म्हणाल्या.

सर्व्हे अनुकुल नसल्याने निवडणूका लांबणीवर

केंद्र व राज्य सरकार सर्व्हेच्या अंदाजानुसार निवडणूका लावत आहे. त्यांच्यासाठी सर्व्हे फारचा चांगला नसल्याने महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणूका घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे जनतेची कामे खोळंबली आहेत. जनतेने कामे कोणाकडे न्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूका व्हायला हव्यात पण त्या लवकर होतील असे वाटत नाही, असे खासदार सुळे म्हणाल्या.

 इंडियाचे जागा वाटप ठरलेले नाही

आगामी लोकसभा निवडणूकीचे जागा वाटप आता इंडियाचे म्हणून होईल. इंडियाचे जागा वाटप अद्याप ठरलेले नाही. ही चर्चा लवकरच होईल असे सांगून सुप्रिया सुळे म्हणाल्या, तत्पूर्वी देशभर सर्व्हे होईल, जेथे जे जिंकू शकतील तशा पद्धतीने जागा वाटप होईल.

 बारामतीशी कनेक्ट कायम

बारामतीत ५२ दिवसानंतर आले असले तरी मधल्या काळात ३० दिवस मी संसदेत होते. तेथे मी महिलांवर होणारे अन्याय, महागाई, बेरोजगारी हे मुद्दे उपस्थित करत होते. बारामती व महाराष्ट्रासाठी लढत होते. आजकाल संपर्काची साधने खूप आहेत. त्यामुळे मी बारामतीकरांशी कायम कनेक्ट होते, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.

हे इंडियाचे यश

आगामी निवडणूका लक्षात घेता महागाईवर नियंत्रणाचे केंद्राचे प्रयत्न सुरु आहेत. संसद अधिवेशनात इंडियाच्या घटक पक्षांनी या विषयावर जोर लावला. त्यामुळे आता प्रयत्न सुरु केले आहेत. इतके दिवस का प्रयत्न झाले नाहीत, असा सवाल करून सुप्रिया सुळे म्हणाल्या, कर्नाटकातील जनतेने त्यांना दाखवून दिल्याने आता हे प्रयत्न सुरु झाले आहेत. केंद्र सरकार महिला सुरक्षेबद्दल एक शब्द संसदेत काढत नव्हते. तेथे आम्ही मणिपूरसह हा मुद्दा लावून धरला. त्यामुळे असंवेदनशील सरकारला भूमिका घ्यावी लागली.

हेही वाचा :

पुणे जिल्ह्यात 1 हजार 451 हेक्टरवर कापसाची लागवड

धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील 238 पाण्याचे स्रोत दूषित

Back to top button