पुणे जिल्ह्यात 1 हजार 451 हेक्टरवर कापसाची लागवड | पुढारी

पुणे जिल्ह्यात 1 हजार 451 हेक्टरवर कापसाची लागवड

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  खरीप हंगामात भात, सोयाबीनचे प्रमुख क्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यात सरासरी 50 हेक्टरवर होणारी कापसाची लागवड आता 1 हजार 451 हेक्टरइतकी पोहोचली आहे. कापूस लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढू लागला असून, त्यामध्ये प्रामुख्याने शिरूर व दौंड तालुक्यांची आघाडी असून जुन्नर, बारामती, इंदापूर तालुक्यात क्षेत्र वाढत आहे. गतवर्षाच्या खरिपापेक्षा चालू वर्षी दुपटीहून अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड वाढल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.
गतवर्षी म्हणजे खरीप 2022 त 632 हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. त्यामध्ये जुन्नर 29 हेक्टर, शिरूर 240 हेक्टर, बारामती 206 हेक्टर, इंदापूर 9 हेक्टर, दौंड 148 हेक्टरचा समावेश आहे. याचा विचार करून चालू वर्षी दुपटीहून अधिक कापसाची लागवड झाल्याचे खरिपातील पीक पेरणीच्या ताज्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. अलीकडील काही वर्षांत कापसाला चांगला दर मिळत आहे. याच प्रमुख कारणामुळे कापसाच्या पिकाकडे पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यातील शेतकरी आकृष्ट झाला आहे.  तसेच कॅनॉल पट्ट्याला लागून किंवा क्षारपड जमिनीतही कापूस लागवड करता येत आहे. त्यामुळे चालू वर्षी उशिराने पावसास सुरुवात होऊनही पाच तालुक्यात कापसाची लागवड वाढल्याचेही काचोळे यांनी सांगितले.
खरीप हंगामात झालेली कापसाची पेरणी
तालुका सरासरी   प्रत्यक्ष पेरणी
क्षेत्र-हेक्टर   क्षेत्र-हेक्टर
जुन्नर   2.2     28.00
शिरूर   22     478.4
बारामती   6.86     252.20
इंदापूर   2.00     9.00
दौंड   17.16      683.6 .
एकूण   50.22      1451.20
हेही वाचा :

Back to top button