होर्डिंगच्या आकाराकडे पुणे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

होर्डिंगच्या आकाराकडे पुणे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणार्‍या महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे त्यांनी परवानगी दिलेल्या होर्डिंगच्या आकाराकडे दुर्लक्ष होत आहे. परवाना दिलेल्या दोन होर्डिंगमध्ये तीन मीटर अंतर ठेवण्याचे बंधन असताना अनेक ठिकाणी दोन होर्डिंग एकत्र करून एकच मोठे होर्डिंग उभे करण्यात आले आहे. असाच एक प्रकार टिळक चौक परिसरात सुरू असताना महापालिका मात्र त्याकडे डोळेझाक करताना दिसत आहे.

विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात अनधिकृत होर्डिंग आणि होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातांसदर्भात पुण्यातील आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते. या वेळी झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारकडून पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू आहे, एक महिन्याच्या आत सर्व अनधिकृत होर्डिंग काढून टाकली जातील, असे आश्वासन दिले गेले होते.
दरम्यान, अधिकृत होर्डिंगला परवानगी देताना आकाशचिन्ह विभागाकडून त्या होर्डिंगमालकांनी होर्डिंग उभे करताना अ़टी व शर्तींचे पालन केले आहे का याची पडताळणी केली जाते. नियमात बसणार्‍या होर्डिंगलाच परवानगी दिली जाते. यामध्ये होर्डिंगचा आकार जास्तीत जास्त 40 बाय 20 असावा, असा नियम आहे.

दोन होर्डिंगमध्ये तीन मीटर अंतर असावे, असा नियम आहे. मात्र, अनेक होर्डिंगचे मालक दोन होर्डिंग एकत्र करून एकच मोठे होर्डिंग तयार करतात. त्याकडे आकाशचिन्ह विभागाचे दुर्लक्ष होत आहे. असाच एक प्रकार टिळक चौकाजवळ सुरू आहे. दोन होर्डिंग एकत्रितपणे उभी केली जात आहेत. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे विचारणा केली असता, होर्डिंगचे स्ट्रक्चर आणि परवाना यांची माहिती घेऊन ते काम थांबविण्यासंदर्भात कारवाई केली जाईल, असे सांगितले.

हेही वाचा :

पिंपरी शहरातील वृक्षतोडीला बसणार आता चाप

नाशिकमधील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा तंबूत डेरा, एका रात्रीत उभारले दुसरे कार्यालय

Back to top button