पिंपरी शहरातील वृक्षतोडीला बसणार आता चाप | पुढारी

पिंपरी शहरातील वृक्षतोडीला बसणार आता चाप

पिंपरी(पुणे) : शहरात विनापरवाना बेसुमार वृक्षतोड करण्यात येत आहे. अशा घटना शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शहरातील वृक्षसंवर्धनास धोका निर्माण होत आहे. या प्रकारास आळा घालण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने स्वतंत्र पथके नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे बेसुमार वृक्षतोडीला आता चाप बसणार आहे. तसेच, नागरिकांना तक्रार करण्यासाठी स्वतंत्र क्रमांक देण्यात येणार आहे.

भोसरी एमआयडीसीतील खासगी कंपनीत 8 वृक्षांची तोड

भोसरी एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत बुधवारी (दि.16) 8 झाडे तोडण्यात आली. तसेच, संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनसमोरील पदपथावरील फांद्या तोडण्यासाठी परवानगी घेऊन असंख्य झाडे खोडापासून कापण्यात आली आहेत. तसेच, बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात येत आहेत. जाहिरात होर्डिंग, फलक दिसण्यासाठी झाडांची कत्तल केली जात आहे. खासगी जागेतील तसेच, महापालिकेची झाडेही विनापरवाना तोडली जात आहेत. मोहनगर, दत्तनगर येथील महापालिकेच्या उद्यानातील अनेक झाडे तोडण्यात आली. नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडियमच्या आवारातील झाडांची कत्तल करण्यात आली.

असे प्रकार शहरात वाढतच आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका प्रशासन या संदर्भाग गांभीर्याने पावले उचलत नसल्याच्या तक्रारी आहेत. उद्यान विभाग मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे. या बेसुमार वृक्षतोडीच्या घटनांची दखल घेऊन विनापरवाना वृक्षतोडीस लगाम लावण्यासाठी उद्यान विभागाचे 4 स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार आहेत. हे पथक आपल्या भागातील वृक्षांची सातत्याने पाहणी करणार आहेत. असे प्रकार आढळल्यास तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाईही करणार आहेत. तसेच, सारथी हेल्पलाइन प्रमाणे स्वतंत्र क्रमांक जाहीर करण्यात येणार आहे.

कंपनी मालक, ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

भोसरी, एमआयडीसी भागातील ब्लॉक एफ टू, वंडर कार शोरूमजवळ येथील कटफास्ट या खासगी कंपनीच्या आवारातील तसेच, पदपथावरील जुनी झाडे तोडण्यात आली आहेत. महापालिकेच्या मालकीची 4 मोहोगणीचे झाडे, 1 कांचनचे झाड, 1 केशियाचे झाड, 1 रेनट्रीचे झाड आणि कंपनीच्या आतील एक आंब्याचे झाड अशी एकूण 8 झाडे जमिनीपासून तोडण्यात आली आहेत. ती ट्रकमधून भरून नेण्यात येत होती. तो लाकडे भरलेला ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.

विनापरवाना वृक्षतोड करणारे कंपनीचे मालक सुरेश जे बजाज आणि ठेकेदार राजेंद्र बाबू मांजरे (रा. बौध्दनगर, निगडी) यांच्याविरोधात महाराष्ट्र झाडे तोडणे (नियमन) अधिनियम 1964 मधील 3 (1), 4, आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 नुसार कलम 21 (1) नुसार भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी उद्यान सहायक सुहास सामसे (वय 47) यांनी फिर्याद दिली आहे.

वृक्षतोड केल्यास तात्काळ फौजदारी गुन्हा

विनापरवाना केल्या जाणार्‍या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. अशा लोकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यासाठी उद्यान विभागाचे शहरभरासाठी स्वतंत्र पथके तैनात केली जाणार आहेत, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

हेही वाचा

नर्गिस फाखरी ते कियारा अडवाणी बॉलीवूड ताऱ्यांनी OTT मध्ये दाखवली चमक

पिंपरी : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी टॉय शेअरींग बँक

पैठण : व्यापाऱ्याचे घर फोडून चार लाखाहून अधिक सोन्या चांदीच्या दागिन्यावर मारला डल्ला

Back to top button