पुणे : ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र उपचार विभाग | पुढारी

पुणे : ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र उपचार विभाग

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ससून सर्वोपचार रुग्णालयात तृतीयपंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. नवीन 11 मजली इमारतीत वॉर्ड सुरू करण्यात आला असून, सुरुवातीला 8 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विभागाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. तृतीयपंथी संघटनांतर्फे ससूनच्या अधिष्ठातांना 15 जानेवारी 2022 रोजी मागणीचे निवेदन देण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी लवकरच अशी सोय उपलब्ध करू, असे आश्वासन दिले होते. अखेर दीड वर्षानंतर स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी ’पुढारी’शी बोलताना दिली.

तृतीयपंथीयांच्या बाह्यरुग्ण विभाग, वैद्यकीय तपासणी, चाचणी, अ‍ॅडमिट करून घेण्याची सोय अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या आधी मुंबईतील जे. जे. रुग्णालयांतर्गत असलेल्या जी. टी. रुग्णालयात वॉर्ड नंबर 13 हा तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्रपणे देण्यात आला आहे. आता, ससूनमध्येही त्यांना स्वतंत्र उपचार मिळतील. वॉर्डला संलग्न स्वतंत्र प्रसाधनगृह, विशेष ओपीडी, तपासणी आणि उपचारासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहे.

डॉ. ठाकूर म्हणाले, ’तृतीयपंथी रुग्णांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशा सूचना कर्मचार्‍यांना देण्यात आल्या आहेत. त्यांना सर्व प्रकारच्या तपासण्या, औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वॉर्डमध्ये 24 बेडची व्यवस्था करण्यात असून, सुरुवातीच्या टप्प्यात 6 खाटा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. येथे आयसीयू सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.’

हेही वाचा :

Rain Update : राज्यात आजपासून पुन्हा एकदा मुसळधार

आजचे राशिभविष्य : या राशीचे लोक प्रेमात आकंठ बुडालेले आहेत, त्यांना प्रेमगीत ऐकू येवून आज ते सर्व विसरून जाणार आहेत

 

Back to top button