पुणे रेल्वे स्थानकावर लवकरच मेट्रोचे तिकीट | पुढारी

पुणे रेल्वे स्थानकावर लवकरच मेट्रोचे तिकीट

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  प्रवाशांना पुणे रेल्वे स्थानकावर आता रेल्वेच्या तिकिटाप्रमाणे मेट्रोचे तिकीट काढता येणार आहे. कारण रेल्वे स्थानकावर आता मेट्रोची तिकीट खिडकी उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच मेट्रोचे तिकीटदेखील उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासन आणि मेट्रो प्रशासन यांच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी ही तिकीट खिडकी उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. रेल्वेतून उतरल्यावर रेल्वे प्रवाशांना मेट्रोची फिडर सेवा खूपच महत्त्वाची ठरणार आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रवाशांना मेट्रोचे तिकीटदेखील तात्काळ उपलब्ध व्हावे याकरिता ही तिकीट खिडकी उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रवाशांच्या सोयीची जागा निवडणार
रेल्वे प्रशासन आणि मेट्रो प्रशासन पुढील आठ दिवस पुणे रेल्वे स्थानकावर एकत्रित सर्व्हे करणार आहे. त्यानंतर स्थानकावरील प्रवाशांना सोयीस्कर अशी जागा निवडण्यात येईल. त्यानंतरच अशी खिडकी उभारली जाणार आहे. त्यासाठी सर्व्हे झाल्यानंतर रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) इंदु दुबे यांची याकरिता परवानगी घेण्यात येणार आहे. येथे प्रवाशांकरिता एक खिडकी असावी, असे वृत्त दै.’पुढारी’कडून यापूर्वी प्रसिध्द करण्यात आले होते. याच खिडकीवर रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीटसुध्दा असावे, जेणेकरून फुकट्या प्रवाशांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी उघडण्यासंदर्भाात रेल्वे पुणे विभाग आणि पुणे मेट्रो यांच्यात चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत पुणे रेल्वे स्थानकावर संयुक्त पाहणी केली जाईल. त्यानंतर येथे जागा निश्चित केली जाईल.
                              -डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग. 

हेही वाचा :

अन्नधान्य भाववाढीचे चक्र

कोविड कंत्राटी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांना अटक

Back to top button