कोविड कंत्राटी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांना अटक

कोविड कंत्राटी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांना अटक

मुंबई ,पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेतील कोविड कंत्राट घोटाळ्याप्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांना अटक करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक मित्र सुजीत पाटकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोरोना काळात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला कोविड सेंटर उभारणी, डाॅक्टर आणि कर्मचारी पुरवठा, वैद्यकीय उपकरणे, औषध खरेदी अशी कोट्यावधी रुपयांची कंत्राटे देऊन मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करत मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती. याप्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, फर्मचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन हा गुन्हा पूढील तपासासाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसमधील भागीदारांपैकी एक असलेल्या राजीव ऊर्फ राजू साळुंखे आणि त्यांचे मदतनीस सुनील ऊर्फ बाळा कदम (५८) अशा दोघांना अटक करत मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अन्य संबंधितांचे जबाब नोंद केले. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणात एप्रिल महिन्यात आरोपपत्रसूद्धा दाखल केले. या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. आर्थिक गुन्हे शाखेचा तपास मधल्या काळात थंडावला होता. याच दरम्यान ईडीने गुन्हा दाखल करुन कारवाईला सुरुवात केली.

ईडीच्या पथकांनी २१ आणि २२ जूनला घोटाळ्याशी संबंधित असलेल्या सुजीत पाटकर यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी संजीव जयस्वाल, ठाकरे सेनेचे सचिव सुरज चव्हाण आणि अन्य मनपा अधिकारी, कंत्राटदार, मध्यस्थ अशा संबंधितांच्या घर, कार्यालये आणि मालमत्तांसह पालिकेचे कार्यालय अशा १६ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर ईडीने सुजीत पाटकर आणि दहिसर जंबो कोविड केंद्राचे डीन डॉ. किशोर बिसुरे यांना १९ जुलैच्या रात्री अटक केली. ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुजीत पाटकर यांनी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

सुजित पाटकर यांनी दहिसर आणि वरळी येथील दोन जंबो कोविड सेंटरसाठी वैद्यकीय आणि पॅरा-मेडिकल स्टाफ पुरवण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी सादर केलेले भागीदारी करार बनावट होते. त्यामुळे त्यांची कोठडीत चौकशी करण्यात आली. फसवणूकीचे आरोप गंभीर आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद करत सुजित पाटकर यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने सुजित पाटकर यांचा ताबा घेत त्यांना अटक केली आहे.

लाईफलाईन हाॅस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसची स्थापना २६ जून २०२० ला झाली. मात्र त्याची नोंदणी झाली नव्हती. फर्मने खोटे भागीदारी डीड तयार केले आहे. नोंदणीसाठी लागणारा स्टॅंप २० मार्च २०२० चा आहे. तसेच, डीड नोटरीकृत नसल्याचाही आरोप आहे. दहिसर आणि वरळी येथील जंबो कोविड सेंटर्सच्या कराराला मंजुरी देण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे बनावट होती. आरोपींनी निविदा त्यांच्या नावे पास करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात किंवा बनावट करण्यात सक्रिय भूमिका बजावली आहे. अशाप्रकारे पालिकेची ३८ कोटींना फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

ईडीने अटक केल्यानंतर २१ जुलै ते २६ जुलै या दरम्यान पाच वेळा आपल्याकडून दबावाखाली जबाब नोंदवून घेतले. आरोपींना गोवण्याचा प्रयत्न करणारी विधाने रेकाॅर्ड केली गेली आहेत. असाआरोप करत सुजित पाटकर यांनी याचिका विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करुन ही विधाने, जबाब मागे घेण्याची विनंती केली आहे. न्यायालयाने यावर ईडीकडून उत्तर मागवले आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news