पुणे: ओतूरच्या डुंबरवाडीत महिलेवर चाकू हल्ला, आरोपी अटकेत | पुढारी

पुणे: ओतूरच्या डुंबरवाडीत महिलेवर चाकू हल्ला, आरोपी अटकेत

ओतूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: कल्याण-नगर महामार्गांलगत असलेल्या डुंबरवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीतील जनता कॉलनी येथे गुरुवारी (दि. १७) पहाटेच्या सुमारास एका महिलेवर तरुणाने चाकू हल्ला केल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली. हल्ला झालेल्या महिलेचे नाव जया राजेंद्र वेताळ (वय ३५) असे असून राजेंद्र गोरक्षनाथ धोत्रे असे चाकूने हल्ला करणाराचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान जया वेताळ या घटनेत गंभीर जखमी झाल्या आहेत. ”तू महिलांकडे वाईट नजरेने बघू नकोस” असे जया यांनी धोत्रे आरोपीस सुनावले होते. त्याचाच राग मनात धरून गुरुवारी पहाटे ५.४५ वाजेदरम्यान नळावर पाणी भरणाऱ्या जया वेताळ यांना धोत्रे याने बोलण्याच्या बहाण्याने जवळ येत आपल्याजवळील चाकूने पोटाच्या दिशेने भोसकण्याचा प्रयत्न केला; मात्र जयाने तो वार आपल्या हातावर झेलल्यामुळे त्या बचावल्या. त्यानंतरही धोत्रे याने चाकूहल्ला सुरूच ठेवल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे त्यांचे पती व बाजूचे लोक जमा झाल्याने धोत्रे पसार झाला. घटनेची माहिती मिळताच ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस कर्मचारी सखाराम जुम्बड, पोलीस पाटील किरण भोर हे घटनास्थळी तात्काळ हजर झाले व राजू धोत्रे यास ताब्यात घेतले आहे.

यापूर्वी पत्नीच्या खुनाचा गुन्हा

दरम्यान राजेंद्र धोत्रे याने काही वर्षांपूर्वी पूणे येथे आपल्या पत्नीचा खून केल्याने त्यास खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. तो नुकताच खुनाची शिक्षा भोगून डुंबरवाडीच्या जनता कॉलनी येथे एकटाच रहात होता, असे फिर्यादी जया वेताळ यांनी आपले पोलीस जबाबात नमूद केले आहे.

हेही वाचा:

Sakshna Salgar : लबाडाला हबाडा बीड जिल्हा देणार; सक्षणा सलगरांचा अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल

भोर शहरात टँकरने पाणीपुरवठा

पुणे जिल्ह्यातील भात लागवड 90 टक्क्यांवर

 

Back to top button