पुण्यातून परदेशात चालली पहिली काच प्रतिमा | पुढारी

पुण्यातून परदेशात चालली पहिली काच प्रतिमा

सुनील जगताप

शालेय शिक्षणात फारसे रस नसलेला…. आपल्यातील असलेल्या कलेला प्रोत्साहन देत काच प्रतिमेची निर्मिती सुरू केली. अनेक देवदेवतांसह महापुरुषांच्या काच प्रतिमा तयार करीत असताना प्रथमच परदेशात काच प्रतिमेला मागणी आली आहे. राहुल लोहकरे या कलाकाराने श्री स्वामी समर्थांची साकारलेल्या काच प्रतिमेला प्रथमच दुबईतून मागणी आली आहे.

लोहकरे म्हणाले, हे फक्त काचेवरील पेंटिंग नाही. विविध रंगी आणि विविध पोत (टेक्सश्चर्स ) असलेल्या इंपोर्टेड काचा वापरून या माध्यमातून काच प्रतिमा निर्मिती केली जाते. हे काम हाताने काचा कापून केले जाते. सर्व कापलेल्या काचांना आधी कॉपर टेप (म्हणजे तांब्याची पट्टी) लावली जाते व नंतर शिसे (लेड) वितळवून त्याने सर्व काचा जोडल्या (वेल्डिंग) जातात. त्यातील चेहरा, दागिने असे काही भाग पारदर्शक रंग वापरून रंगवले जातात. पाठीमागून प्रकाशमान होईल, अशा एलईडी ट्यूब लाईट व प्लायवूड बॉक्समध्ये ही काच प्रतिमा बसवली जाते. गेली 19-20 वर्षे स्टेन्ड ग्लास कलेच्या माध्यमातून देवीदेवतांच्या काच प्रतिमा तयार करण्याचे काम करीत आहेत. 10 बाय 12 च्या घरात राहून राहुल आपली कला जोपासत आहे.

जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. आईला मदत करावी म्हणून छोटी-मोठी नोकरी करू लागलो. काही वर्षे नोकरी केल्यावर आईच्या पाठिंब्याने या कलेकडे वळलो. 2004 साली या कामाला सुरुवात करीत असताना तिरुपतीच्या बालाजीवर श्रद्धा असल्याने पहिली काच प्रतिमा श्री बालाजींची केली. तेथूनच माझ्या कलेच्या प्रवासाला सुरुवात झाली. आतापर्यंत 150 हून अधिक काच प्रतिमा तयार करून
दिलेल्या आहेत.                   

                  – राहुल शामराव लोहकरे ,काच प्रतिमा तयार करणारा कलाकार

या काच प्रतिमांचा समावेश
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, लालबागचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक सोहळा, श्री दत्तमहाराज, श्री श्रीपाद श्रीवल्लभ, श्री स्वामी समर्थ,, श्री शंकर महाराज, श्री गणेश महाराज, श्री साईबाबा, श्री कुबेर, श्री लक्ष्मी-नारायण, श्री विठ्ठल-रखुमाई, श्री बालाजी व हाथिरामजी, श्री महालक्ष्मी, श्री तुळजाभवानी माता, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदी 150 हून अधिक काच प्रतिमा तयार केल्या आहेत.

या आकारामध्ये असते काच प्रतिमा
काच प्रतिमेचा मोठा साईज 36 इंच बाय 60 इंच आणि प्लायवूड बॉक्स फ्रेमसह साईज 48 इंच बाय 72 इंच तर काच प्रतिमेचा 18 इंच बाय 24 इंच आणि प्लायवूड बॉक्स फ्रेमसह 24 इंच बाय 30 इंच साईज असते. एका काच प्रतिमेच्या निर्मितीसाठी कोणती काच प्रतिमा आहे त्यानुसार साधारण 1 ते 3 महिने लागतात.

हेही वाचा :

Global Water Scarcity | जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला पाणी टंचाईची तीव्र समस्या- रिपोर्ट

राष्ट्रवादीत फूट की एकसंध लवकरच कळेल : गिरीश महाजन

Back to top button