पुणे : ‘पुरुषोत्तम’ जल्लोषात सुरु ! भरत’मध्ये घुमला ’आव्वाज कुणाचा’ | पुढारी

पुणे : ‘पुरुषोत्तम’ जल्लोषात सुरु ! भरत’मध्ये घुमला ’आव्वाज कुणाचा’

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ‘अरे आव्वाज कुणाचा’ घोषणाबाजी, विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुललेला भरत नाट्य मंदिरचा परिसर…एकांकिका सादर करणार्‍या कलाकारांमध्ये दिसलेला युवाजोश….थोडीशी भीती… हुरहुर… पण आनंदात आणि उत्साहात तरुण कलाकारांनी केलेले एकांकिकांचे सादरीकरण, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस बुधवारी दमदार सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या जोशात अन् जल्लोषात कोणतीच कमतरता नव्हती अन् त्यांच्या एकांकिकांच्या सादरीकरणात हाच जोश आणि आत्मविश्वास पाहायला मिळाला. कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय अन् एकांकिकांच्या वेगळ्या विषयाने आणि मांडणीने प्रेक्षकांची मने जिंकली.

महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजित 58 व्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत महाविद्यालयीन संघातील तरुणाईने रंगमंचावर एकांकिकेचे सादरीकरण केले अन् त्यांच्या सादरीकरणाला भरभरून दादही मिळाली. प्राथमिक फेरीला सायंकाळी पाच वाजता मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘चिकन खर्डा विथ गार्लिक नान’ या एकांकिकेने सुरुवात झाली. या एकांकिकेत मांडलेला सिंगल पॅरेंट्स आणि त्यांच्या मुलांची कहाणीचा विषय प्रेक्षकांपर्यंत समर्पकपणे पोचला. त्यानंतर सादर झालेल्या आयएलएस विधी महाविद्यालयाच्या ‘आरं संसार संसार…’ ही एकांकिकाही प्रेक्षकांच्या मनाला भिडली.

तर, शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ’राखणदार’ ही एकांकिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
प्राथमिक फेरीत 51 महाविद्यालयांच्या एकांकिकांचे सादरीकरण पाहायला मिळेल. गुरुवारी (दि.17) व्हीआयआयटीची ‘पासवर्ड’, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाची (ताथवडे) ‘पंक्चरपोहे’ आणि कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘पूर्णविराम’ ही एकांकिका पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

पिंकीचा विजय असो : पिंकीला मिळणार नवा चेहरा, नवं आयुष्य

DRDO चे माजी प्रमुख अरुणाचलम यांचे कॅलिफोर्नियात निधन; PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

Back to top button