पुणे : खादीच्या झेंड्यासह तिरंगी फेटे | पुढारी

पुणे : खादीच्या झेंड्यासह तिरंगी फेटे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खादीचे झेंडे, तिरंगी उपरणी, बॅच, रिस्टबँड, पुणेरी पगडी, फेटे अशा वस्तूंच्या तिरंगी रंगामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ उजळून निघाली होती. स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी करण्यासाठी पुणेकरांनी उत्साहाने दुकांनांमध्ये गर्दी केली होती. तिरंगी झेंडे पाहताना सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून येत होता. या वर्षी खादीच्या झेंड्यासह तिरंगी फेट्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेसह प्रत्येक चौका-चौकात तिरंगी झेंडे विक्रीसाठी होते.

त्यामध्ये वेगवेगळ्या आकारांचे झेंडे, विविध महापुरुषांच्या छायाचित्रांतील झेंडेदेखील विक्रीसासाठी होते. शाळेमध्ये 15 ऑगस्टला मोठ्या उत्साहात सहभागी होणारे शालेय विद्यार्थी आपल्या पालकांना घेऊन झेंडे खरेदी करतानाचे चित्र ठिकठिकाणी बघण्यास मिळत होते. समाजमाध्यमावर आपला स्वातंत्र्य दिन कसा साजरा झाला हे सांगण्यासाठी अनेकांची चढाओढ असते. त्यामुळे रिल्स बनवणे, फोटो काढण्यासाठी लागणार्‍या मोठ्या झेंड्यांचीदेखील या वर्षी मोठ्या प्रमाणात खरेदी करताना तरुणाई दिसली.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनासाठी झेंडे खरेदी करणार्‍यांना भारत फ्लॅग फाउंडेशनकडून 15 ऑगस्टसाठी नियमांच्या पत्रकाचे वाटप करण्यात आले. ध्वजाबाबतची माहिती आणि ‘हे करा, हे करू नका’ अशी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याबाबत अनिकेत शिंदे म्हणाला, ‘आम्ही सर्व आयटीमध्ये काम करणारे तरुण आहोत, आमची थिम ठरली आहे, त्यानुसार ड्रेपरी घेऊन प्रत्येक ग्रुपने मोठ्या आकाराचे खादीचे झेंडे खरेदी केले आहेत. पुण्यामध्ये एका ठिकाणी ध्वजारोहणास उपस्थित राहणार आहोत. त्यानंतर फोटोशूट होणार आहे.’

खादीच्या झेंड्यांना मागणी आहे. सरकारी कार्यालये, पोलिस चौकी, न्यायालये, शाळांकडून अधिक मागणी आहे, तर हर घर झेंडा मोहिमेमध्ये घरी लावण्यासाठी पंचवीस ते तीस रुपयांपासूनच्या झेंड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर तिरंगी उपरणी, बॅच, तिरंगी रिस्टबँड, पुणेरी पगडी, तिरंगी फेटे यालादेखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याशिवाय तिरंगी झालरीचीदेखील या वेळी मागणी आहे. सजावटीचे, सन्मानाचे साहित्य ज्यामध्ये तिरंगी शालसारख्या वस्तू नागरिकांकडून खरेदी केल्या
जात आहेत.

गिरीश मुरुडकर,
अध्यक्ष, भारत फ्लॅग फाउंडेशन

हेही वाचा

जमिनीखालून बाहेर आल्या तीन मगरी!

गरजेनुसार मेंदूतील ‘जीपीएस’ उघडतात पक्षी!

तळेगाव स्टेशन : वातावरणातील बदलामुळे भातपीक धोक्यात 

Back to top button