बारामतीतील जनावरे, कुत्री, डुकरांचा होणार बंदोबस्त | पुढारी

बारामतीतील जनावरे, कुत्री, डुकरांचा होणार बंदोबस्त

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येबाबत अखेर पालिका प्रशासन जागे झाले. शहरातील मोकाट जनावरांवर नियमानुसार कारवाई करण्यासाठी ठेकेदारांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला अधिकारीवर्ग देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून दैनिक ‘पुढारी’ने मोकाट जनावरांबाबत सातत्याने वृत्त प्रकाशित करीत या प्रश्नावर पालिका प्रशासनाला जाग आणण्याचे काम केले होते.

मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लागल्याने बारामतीकरांनी दैनिक ‘पुढारी’चे आभार व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मोकाट जनावरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मोकाट जनावरांवर कारवाई होणार असल्याने वाहतूक समस्येतून बारामतीकरांची सुटका होणार आहे. शहरात ज्या ठिकाणी मोकाट जनावरांमुळे स्वच्छता व सुरक्षितता धोक्यात येत असल्यास ठेकेदारांना फोन करीत याबाबत माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर संबंधित ठेकेदार या मोकाट जनावरांवर कारवाई करतील. शहरातील मुख्य चौकात ही जनावरे वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने नागरिकांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.

मोकाट जनावरांमुळे अनेकदा छोटे- मोठे अपघात घडले आहेत. शहरातील मुख्य चौक, शाळा-महाविद्यालये, प्रमुख रस्ते यावर ही जनावरे कळपाने जा-ये करतात. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पालिकेने घेतलेल्या निर्णयाचे बारामतीकरांनी स्वागत केले आहे. मोकाट जनावरांप्रमाणेच भटक्या कुत्र्यांच्या, डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. बारामती शहर आणि परिसरात मोकाट जनावरे दिसल्यास ठेकेदार बबलू कांबळे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे व अजय लालबिगे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोकाट डुकरांसंबंधी उत्तम धोत्रे, सोनवणे व लालबिगे यांच्याशी संपर्काचे आवाहन पालिकेने केले आहे.

हेही वाचा

भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे; पुण्यात शिवसेनेचे आंदोलन

Godhra Kand : गोध्रा जळीत कांडातील दोषींना जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सातारा : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या प्रकल्पाला गती

Back to top button